
मुंबई :
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून परिचारिका संवर्गाच्या विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जाच्या तपशीलात बदल करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना २१ मार्चपर्यंत अर्जाच्य तपशीलात सुधारणा करता येणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता सामाईक प्रवेश परीक्षांचे आयोजन करण्यात आलेले आहे. परिचारिका संवर्गातील बीएस्सी नर्सिंग, सार्वजनिक आरोग्य परिचारिका (पीएचएन) आणि मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका (डीपीएन) या अभ्यासक्रमासाठी अर्ज नोंदणी करताना काही उमेदवारांकडून अनावधनाने विविध प्रकारच्या चुका झाल्या आहेत. त्या दुरुस्त करण्याबाबत त्यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या कार्यालयाकडे लॉगीनमधून, दूरध्वनी, ईमेलद्वारे व प्रत्यक्ष कार्यालयात भेट देऊन विनंती केली होती. याची दखल घेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांना ऑनलाईन पध्दतीने भरलेल्या अर्जात नाव, जन्मतारीख, छायाचित्र, सही, लिंग बदल करणे इत्यादी बदल करण्याची संधी देण्याचा निर्णय राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार २१ मार्च २०२५ पर्यंत विद्यार्थ्यांना स्वतःच्या लॉगीनमधून अर्जाच्या तपशीलामध्ये सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
४८ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी
परिचारिका संवर्गातील बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाची नोंदणी प्रक्रिया १५ मार्च रोजी तर सार्वजनिक आरोग्य परिचारिका (पीएचएन), मनोरुग्ण तज्ज्ञ परिचारिका (डीपीएन) या अभ्यासक्रमांची नोंदणी प्रक्रिया २८ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आली. बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाची परीक्षा ७ एप्रिल तर पीएचएन, डीपीएन या अभ्यासक्रमांची परीक्षा ८ एप्रिल रोजी आहे. बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी ४७ हजार ४९७ विद्यार्थ्यांनी तर पीएचएन, डीपीएन अभ्यासक्रमासाठी ४७७ विद्यार्थ्यांनी अशी एकूण ४७ हजार ९७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
तपशील सुधारण्याची शेवटची संधी
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून तपशीलात सुधारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांना दिलेल्या संधीदरम्यान त्यांनी काळजीपूर्वक सुधारणा कराव्यात. यानंतर तपशीलात सुधारणा करण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार नसल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
गतवर्षी झालेले प्रवेश
बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी ११ हजार २८० जागा असून, गतवर्षी ९ हजार २४४ जागांवर प्रवेश झाले होते. तसेच डीपीएन या अभ्यासक्रमासाठी पुणे व ठाण्यामध्ये प्रत्येकी एक असे केवळ दोन महाविद्यालये असून, यासाठी ४० जागा आहेत. आहेत. पीएचएन अभ्यासक्रमासाठी नागपूर येथे १ महाविद्यालय असून ३० जागा आहे. या एकूण ७० जागांपैकी ६९ जागांवर प्रवेश झाले होते.