
पुणे :
नाशिकचे डॉ. सुभाष पवार हे पुढील महिन्यात जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी सज्ज झाले आहेत. माऊंट एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी डॉ. पवार हे गिरिप्रेमी ॲडव्हेंचर फाऊंडेशन मार्फत चढाईकरिता तयारी करत असून गिरिप्रेमी संस्थेतील ज्येष्ठ गिर्यारोहक व तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी जीवनगौरव पुरस्कार प्राप्त उमेश झिरपे त्यांना मार्गदर्शन करत आहेत.
पुण्यात गिरिप्रेमी संस्थेतर्फे आय. एम. एफ. फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात ३५० हून अधिक सहसप्रेमींच्या उपस्थितीत डॉ. पवार यांना भारताचा तिरंगा ध्वज प्रदान करण्यात आला. याप्रसंगी गिरिप्रेमीच्या संस्थापिका अध्यक्षा उषःप्रभा पागे, तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी जीवनगौरव पुरस्कार प्राप्त उमेश झिरपे; एव्हरेस्ट शिखरवीर कृष्णा ढोकले, भूषण हर्षे, आशिष माने, जितेंद्र गवारे हे मंचावर उपस्थित होते.
डॉ. पवार यांनी त्यांच्या वयाच्या ६२ व्या वर्षी शारीरिक तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली. या दरम्यान त्यांनी धावण्याच्या सरावालाही सुरुवात केली. डॉ. पवार यांनी अनेक मॅरथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून, त्यांनी दोन वेळा आयर्नमॅन तर एकदा अल्ट्रामॅन या जागतिक स्तरावरील स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. स्वतःच्या तंदुरुस्तीकडे या वयातही खूप चांगल्या प्रकारे लक्ष देणारे डॉ. पवार हे गिर्यारोहणाचे प्रशिक्षण गिरिप्रेमी ॲडव्हेंचर फाऊंडेशनच्या माध्यमातून घेत आहेत. गिरिप्रेमी ॲडव्हेंचर फाऊंडेशनच्या माध्यमातून डॉ. पवार यांनी माऊंट मेरा (२१,२४७ फूट), अन्नपुर्णा सर्किट ट्रेक, एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक आणि आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर किलीमंजारो (१९,३४१ फूट) यावर यशस्वी चढाई केली आहे.
वयाच्या साठीनंतर सहसा ज्येष्ठ नागरिक शरीरातील अनेक व्याधींचा तक्रारी करायला सुरुवात करतात. परंतु डॉ. पवार यांनी ही विधान चुकीचे ठरवून साठीनंतर आपल्या शरीराकडे विशेष लक्ष देत इतकी तंदुरुस्ती केली आहे की आज ते सत्तरी जवळ असताना जगातील सर्वोच्च शिखर चढाईकरीता सज्ज झाले आहेत. डॉ. पवार यांची ही जिद्द फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच नव्हे तर सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
– उमेश झिरपे, ज्येष्ठ गिर्यारोहक व गिरिप्रेमी अष्टहजारी मोहिम नेते