
मुंबई :
वैद्यकीय क्षेत्रातील लक्षणीय यश संपादन करत मुंबईच्या नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी जिवंत दात्याकडून दान करण्यात आलेल्या लहान आतड्याच्या प्रत्यारोपणाची दुर्मिळ आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली आहे. नाशिकचे रहिवासी प्रवीण विसपुते (४९) हे ग्लास फॅक्टरीमध्ये काम करत असून, या शस्त्रक्रियेने त्यांना नवजीवन मिळाले आहे. हे यावर्षीचे पहिले जिवंत दात्याकडून दान करण्यात आलेल्या आतड्याचे प्रत्यारोपण आहे. रुग्णाची पत्नी जयश्री यांनी हे निःस्वार्थ दान केले आहे.
मुंबईच्या नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या एचपीबी सर्जरी, लिव्हर आणि मल्टी ऑर्गन ट्रान्सप्लान्ट डॉ गौरव चौबळ यांनी हे प्रत्यारोपण २३ फेब्रुवारी २०२५ रोजी केले. त्यांच्यासोबत चार सर्जन्स, तीन भूलतज्ञ, सहा वरिष्ठ नर्सेस आणि इतर प्रशिक्षित पॅरामेडिक स्टाफ यांची मल्टीडिसिप्लिनरी टीम होती. जयश्री यांचे जवळपास १५० सेमीचे निरोगी लहान आतडे विसपुते यांच्या पोटामध्ये प्रत्यारोपित करण्यात आले. पोटातील अवयवांच्या सर्व प्रत्यारोपणांमध्ये लहान आतड्याचे प्रत्यारोपण हे सर्वात दुर्मिळ मानले जाते. एका वर्षभरात संपूर्ण जगभरात जवळपास १०० लहान आतड्यांची प्रत्यारोपणे केली जातात आणि त्यापैकी ७ ते ८ भारतात केली जातात.
या केसबद्दल डॉ चौबळ यांनी सांगितले, “जवळपास गेले एक दशकभर विसपुते यांना सतत संसर्ग, ताप आणि पोटामध्ये शरीर कमजोर करणाऱ्या वेदना असे त्रास होत होते. आता सर्जरीला फक्त वीस दिवस झाले आहेत. विसपुते यांची तब्येत पूर्णपणे बरी होण्याच्या मार्गावर आहे, जराही वेदना न होता किंवा टोटल पॅरेंटरल न्यूट्रिशनवर अवलंबून न राहता खाऊ शकत आहेत. (टीपीएन – खाऊ घालण्याची एक पद्धत ज्यामध्ये पोषकतत्त्वे एका रक्तवाहिनीमधून थेट रक्तप्रवाहामध्ये सोडली जातात)” दाता जयश्री यादेखील आता त्यांचा नेहमीचा आहार घेऊ लागल्या आहेत आणि निरोगी जीवनामध्ये परत आल्या आहेत. रुग्णाला २० मार्च २०२५ रोजी हॉस्पिटलमधून घरी पाठवण्यात आले, ते पूर्णपणे बरे होत आहेत आणि निरोगी जीवनाचा आनंद घेण्यासाठी सज्ज आहेत.
डॉ चौबळ आणि त्यांच्या टीमकडे कन्सल्टिंग घेण्याच्या आधी विसपुते यांनी वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले होते. पण या इतर हॉस्पिटलमध्ये त्यांना फक्त वेदनाशामक औषधे देऊन आणि अनिश्चित निदान करून घरी पाठवण्यात आले होते. ३१ डिसेंबर २०२४ रोजी सुरतमध्ये काम करत असताना पोटात खूप जास्त दुखू लागल्याने त्यांना एका स्थानिक हॉस्पिटलमध्ये आणि तिथून नंतर मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. स्कॅनमध्ये एक भयानक वास्तव समोर आले, त्यांच्या लहान आतड्याला गँगरीन झालेले होते. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका होता. तातडीने शस्त्रक्रिया करून त्यांचे जवळपास सर्वच्या सर्व लहान आतडे काढून टाकण्यात आले, त्यामुळे त्यांना स्टमक डीकॉम्प्रेशनसाठी रायल्स ट्यूबवर आणि जिवंत राहण्यासाठी टीपीएनवर अवलंबून राहावे लागले.
डॉ चौबळ यांनी पुढे सांगितले, “रुग्णाला सुपीरियर मेसेन्टेरिक आर्टरी (एसएमए) थ्रोम्बोसिस झाले होते, यामध्ये लहान आतड्याला होणाऱ्या रक्तप्रवाहामध्ये दुर्मिळ आणि जीवघेणे ब्लॉकेज झालेले होते. कॉन्जीनिटल हायपरकोग्युलेबल स्टेट हे याचे प्रमुख कारण होते, रक्त गोठू न देणाऱ्या नैसर्गिक घटकांच्या कमतरतेमुळे हे होते, कोणत्याही वयाच्या व्यक्तीला हा त्रास होऊ शकतो.”
प्रत्यारोपण झाले नसते तर विसपुते (दोन मुलांचे वडील – १९ वर्षांची मुलगी आणि १५ वर्षांचा मुलगा) यांना आतड्याचे गँगरीन, सेप्टिक शॉक आणि किडनीला गंभीर इजा यासारखे जीवघेणे, गुंतागुंतीचे त्रास होऊ शकले असते. आभार व्यक्त करताना विसपुते म्हणाले, “मला वाटत होते की मी जगू शकणार नाही. नानावटी मॅक्समधील संपूर्ण टीम – डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिक आणि सपोर्ट स्टाफ यांचा आणि माझ्या परिवाराचा मनापासून खूप खूप आभारी आहे. ते सर्व माझे जीवनरक्षक आहेत.”