
अमरावती :
एसटीत वाहकाने प्रवासी उत्पन्न कमी आणले तर त्याच्यावर लगेच कारवाई करण्यात येते, मात्र मार्चमध्ये पहिल्या १८ दिवसात गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रतिदिन सरासरी तीन लाख इतकी प्रवाशी संख्येत घट झाली असल्याचे दिसून येत आहे, याची जबाबदारी कुणावर का निश्चित केली जात नाही ? असा सवाल उपस्थित करून याची चौकशी करण्यात येऊन जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सरकारकडे केली आहे. ते आज महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस भवन, अमरावती येथील एसटी कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कोणतेही व्हिजन राबविले जात नसून प्रशासनाकडून परिपत्रके काढली जातात. त्यातून काय फलनिष्पत्ती झाली याचा आढावा घेतला जात नाही. डिसेंबरमध्ये प्रशासनाने परिपत्रक काढून पंचसूत्री जाहीर केली. त्यात जानेवारी २५ ते मार्च २५ या कालावधीत उत्पन्न वाढ करण्यासाठी काही उपाययोजना घालून देण्यात आल्या. त्याला आता तीन महिने व्हायला आले तरी त्यातून आतापर्यंत काय फलनिष्पत्ती झाली यावर कुठल्याच स्थरावर बैठक झाली नाही. आमच्या माहितीप्रमाणे पंचसूत्रीत ठरवून दिल्याप्रमाणे विद्यार्थी पास संख्या वाढली असून उदिष्ट ठरवून दिल्याप्रमाणे १०० कोटीं रुपये उत्पन्न मिळेल असे दिसत आहे. अजूनही काही आगारात स्वच्छतेची प्रगती नाही. मार्गबंद गाड्यांचे प्रमाण मात्र कमी झाल्याचे दिसून येत आहे. ज्या उद्देशाने ही पंचसूत्री जाहीर करण्यात आली त्याचा मुख्य उद्देश उत्पन्न वाढ असून त्यात अपेक्षित सफलता मिळालेली दिसत नाही. पंचसूत्रीला वजन प्राप्त करण्यासाठी परिपत्रकात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. कमी उत्पन्नाला परिवहन मंत्र्यांना जबाबदार धरायचे का? असा सवाल उपस्थित करून ते म्हणाले की, अचानक मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्येत घट झाल्याने मंत्र्यांचीही बदनामी होत असून त्यांनी आता स्वतः लक्ष घालून एसटीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारायला हवा, असेही बरगे यांनी या वेळी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक देणी प्रलंबित असून वाढीव महागाई भत्ता मिळाला नाही. नोव्हेंबरपासून पी. एफ. अँडव्हान्स रक्कम मिळालेली नाही. वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती रक्कम सुद्धा वर्षभरापासून मिळालेली नाही. प्रवाशांना यात्रा, जत्रा व सण साजरे करण्यासाठी त्यांच्या गावी वेळेत पोहचण्यासाठी स्वतः सुट्टी न घेता रात्रदिन काम करणाऱ्या कामगारांना स्वतःचे सण साजरे करण्यासाठी मागणी करून सुद्धा साडे बारा हजार रुपये इतकी सण उचल रक्कम देण्यात आली नाही. दिवाळीपासून आता रमजान ईदपर्यंत साधारण एकूण ६० कोटी रुपये इतकी उचल रक्कम देण्यात आलेली नाही. दररोज तीन ते चार कोटी रुपये खर्चाला कमी पडणाऱ्या एसटीच्या उत्पन्नातून प्रलंबित देणी मिळणे शक्य नाही. सरकारनेच यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे असेही बरगे यांनी यावेळी स्पष्ट केले.
या मेळाव्याला अमरावती शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे या संघटनेचे अमरावती विभागीय अध्यक्ष संदीप मुळे, विभागीय सचिव जयंत मुळे, केंद्रीय संघटन सचिव संजय तळोकार, प्रवीण चरपे, शिवदास स्वर्गे, पंकज देशमुख, धीरज गोगटे, स्वप्नील तायडे, ज्ञानेश कन्नाके, सागर गावंडे, प्रवीण नरोडे, मीनाक्षी पुडके, उज्वला घोटकर, अरुण कलमखेडे, मनीष इंगळे, दीपक सोनटक्के आदी पदाधिकारी उपस्थित होते.