
मुंबई :
भांडुप पश्चिमेला असलेल्या स्टेशन रोडवर पेव्हर ब्लॉक निघाल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. गर्दीच्या वेळेस दाटीवाटीने चालताना पादचा-यांना हे खड्डे दिसत नसल्याने अचानक पाय खड्ड्यात पडून कपाळमोक्ष होण्याच्या अनेक घटना या ठिकाणी घडल्या आहेत. त्यातच पादचा-यांना चालण्यासाठी असलेले हक्काचे पदपथ फेरीवाल्यांनी अडवून ठेवले आहेत. त्यांच्यावर पालिका दिखाऊपणाची तात्पुरती कारवाई करते. मात्र काही वेळातच फेरीवाले पुन्हा पदपथाचा ताबा घेतल्याने पादचा-यांची चालताना कसरत होते. फेरीवाले आणि पालिका अधिकारी यांचे संगनमत असल्यानेच पदपथावर कोणत्याही अडचणींशिवाय फेरीवाले धंदा करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
भांडुप पश्चिमेला असलेल्या स्टेशन रोडवर अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक निघाले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे झाल्याने गर्दीच्या वेळेश पादचा-यांचे पाय खड्ड्यात पडल्याने पाय मोडण्याचे किंवा कपाळमोक्ष होण्याच्या घटना या ठिकाणी सतत घडत आहेत. वारंवार घडणा-या घटनांबाबत तक्रार करुनही पालिकेचे अधिकारी या खड्डयांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्टेशन रोडवर सर्वच ठिकाणी कंत्राटदाराने लावलेले पेव्हर ब्लॉक वरखाली असून त्यात पाय अडखळल्याने अनेकांना जखमा झाल्या आहेत. मात्र भांडुपचे पालिका अधिकारी करतात काय, लोकांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.