
मुंबई :
‘सुप्रीम ट्रॉफी’ (प्रिमियर लीग फॉरमॅट) स्पर्धेची घोषणा सॅफ्रन्स वर्ल्डतर्फे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, मुंबई खो-खो असोसिएशन, मुंबई उपनगर खो-खो असोसिएशन आणि ठाणे खो-खो असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली होईल. ही भव्य स्पर्धा ऑक्टोबर २०२५ मध्ये मुंबईत होणार आहे. ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या खो-खो स्पर्धांपैकी एक ठरेल असे सॅफ्रन्स वर्ल्डतर्फे जाहीर करण्यात आले आहे.
स्पर्धेचा ढाचा :
या स्पर्धेत ८ संघ सहभागी होणार असून त्यासाठी ८ फ्रँचायझी मालक असतील. हे सर्व थरारक खो-खो सामने ८ दिवस चालतील. या स्पर्धेत आठ प्रशिक्षकांचा कस लागणार असून आठ व्यवस्थापकांचे व्यवस्थापन पणाल लागणार आहे. या स्पर्धेत १२० खेळाडू खेळणार असून २७ सामन्यांची मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सामन्यांचे थेट प्रेक्षेपण करण्याची सॅफ्रन्स वर्ल्डची योजना आहे.
आठ संघ दोन गटात विभागले जातील. प्रत्येक संघ आपल्या गटातील संघांबरोबर दोन-दोन सामने खेळतील. दोन्ही गटातील पहिले दोन-दोन संघ उपांत्य फेरी साठी पात्र ठरतील. त्यातील विजेते संघ अंतिम सामना खेळातील.
खेळाडूंचा लिलाव
सप्टेंबर २०२५ च्या दुसऱ्या आठवड्यात खेळाडूंचा लिलाव होणार असून त्यात खेळाडू तीन गटात विभागले जातील. लवकरच सॅफ्रन्स वर्ल्डतर्फे ८ फ्रँचायझी मालकांची घोषणा केली जाणार आहे. खेळाडूंची निवड तीन श्रेणीत केली जाणार असून ‘अ’, ‘ब’ व ‘क’ गटात खेळाडूंची निवड केली जाणार असून अंतिम १२० खेळाडूंची निवड १५० खेळाडूंमधून निवड केली जाणार आहे.
बक्षिसे आणि पुरस्कार :
विजेत्या संघाला बक्षिस : १० लाख रुपये, सुप्रीम ट्रॉफी, उपविजेत्या संघाला बक्षिस : ७ लाख रुपये, प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा गौरव (मॅन ऑफ द मॅच), अंतिम सामन्यामधील तीन सर्वोत्तम खेळाडूंसाठी पुरस्कार, सर्व १२० खेळाडूंना पूर्ण स्पोर्ट्स किट दिले जातील.
या स्पर्धेदरम्यान दररोज पाच हजारांपेक्षा अधिक प्रेक्षकांची उपस्थिती असेल, ज्यात अति महत्त्वाच्या व्यक्ती, सेलिब्रिटी, राजकारणी, क्रीडा व्यक्तिमत्व, व्यावसायिक आणि बॉलिवूड स्टार्स यांचा समावेश असेल. या भव्य इव्हेंटसाठी एक मोठे तात्पुरते स्टेडियम विशेषतः उभारले जात आहे.
लाईव्ह ब्रॉडकास्ट :
सर्व सामने डीडी स्पोर्ट्स, डीडी ओटीटी प्लॅटफॉर्म आणि इतर डिजिटल माध्यमांवर थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत, जेणेकरून हा रोमांचक खेळ आणि मनोरंजन प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकेल. या स्पर्धेसाठी सॅफ्रन्स वर्ल्डचे विजय कालोसे (सीएमडी) यांनी जोरदार तयारी केली असून अधिक माहितीसाठी ८१६९९७७८३३ किंवा ९५९४५७ ३८६९ या नंबरवर संपर्क साधण्याचे आव्हान सॅफ्रन्स वर्ल्डचे विजय कालोसे (सीएमडी) यांनी केले आहे.