
मुंबई :
रत्नागिरीमधील पाच वर्षाच्या मुलाला जन्मताच फिट्सचा त्रास असल्याने रुग्णालयाच्या चकरा, औषधोपचार आणि वेदना हेच त्याच्या आयुष्य बनले होते. शस्त्रक्रिया हाच एकमेव पर्याय असला तरी त्यासाठी ९ लाख ४७ हजार रुपये इतका खर्च असल्याने त्याच्या आई वडिलांच्या आशा मावळल्या. मात्र मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या पुढाकारामुळे मुलाच्या मेंदूची जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्याने मुलाच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील भांबेड गावातील एका वाहन चालक आणि गृहिणीच्या साडे पाच वर्षांच्या चिमुकल्याला जन्मताच फिट्सचा त्रास होता. शारीरिक हालचालींवर ताबा नसणे, वारंवार झटके येणे, त्यामुळे खेळण्याबागडण्याच्या वयात त्या मुलाला रुग्णालयाच्या चकरा, औषधोपचार आणि वेदना याचा सामना करावा लागत होता. बाळाला बरे करण्यासाठी ‘एपिलेप्सी सर्जरी’ हाच एकमेव पर्याय असून, त्यासाठी ९ लाख ४७ हजार १०० रुपये इतका खर्च डाक्टरांनी सांगितला. बाळाच्या आईवडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शस्त्रक्रियेचा खर्च एकूण त्यांच्या आशा क्षणातच मावळल्या. मात्र मुलाच्या उपचारासाठी आतापर्यंतची सर्व जमापुंजी त्यांनी खर्च करण्याचा निर्णय घेतला. मात्र शस्त्रक्रियेसाठी ती पुरेशी नव्हती. नजरेसमोर फक्त अंधार दिसत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने बाळाच्या उपचारासाठी पुढाकार घेतला. कक्षाने निधी उपलब्ध केल्यामुळे बाळाच्या मेंदूमध्ये व्हॅगस नर्व्ह स्टीम्युलेटर चीप बसवण्यात आली. यामुळे त्याचे जीवन पुन्हा नव्या आशेने बहरत आहे.
६ लाख २० हजारांची मदत उभी केली
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी बाळाच्या उपचारासाठी पुढाकार घेतला. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून १ लाख रुपये निधी उपलब्ध करण्याबरोबरच धर्मादाय विभागातून साडे चार लाख रुपये आणि स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ६५ हजार रुपये अशा प्रकारे एकूण ६ लाख २० हजार रुपये इतकी मदत उभी केली.
बाळाच्या मेंदूवर यशस्वी जटिल शस्त्रक्रिया
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने केलेल्या मदतीच्या आधारावर मुंबईतील महालक्ष्मी येथील एसआरसीसी चिल्ड्रन्स रुग्णालात बाळाच्या मेंदूवर जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. बाळाच्या मेंदूमध्ये व्हॅगस नर्व्ह स्टीम्युलेटर चीप बसवण्यात आली असून त्याची प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्याचे जीवन पुन्हा नव्या आशेने बहरत आहे.
आनंद शब्दात मांडता येणार नाही
माझ्या बाळाच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू पाहिलं… ही भावना शब्दात मांडता येणार नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि कक्षातील सर्व लोक आमच्यासाठी देवदूतच ठरले. त्यांनी आम्हाला या संकटातून बाहेर काढलं. हे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही,” अशा शब्दांत बाळाच्या आईने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या छोट्या जीवाचा आणि त्याच्या पालकांचा संघर्ष मनाला भिडणारा होता. बाळावरची शस्त्रक्रिया यशस्वी झाली याचा मनस्वी आनंद आहे.
– रामेश्वर नाईक, कक्षप्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष