
मुंबई :
मार्च सुरू झाल्यापासून राज्यामध्ये तापमान सातत्याने वाढत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमान हे ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. या वाढत्या तापमानामुळे राज्यात मार्चमध्ये ३० जणांना उष्माघाताचा त्रास झाला आहे. राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचे रुग्ण सापडले असले तरी मुंबईमध्ये अद्यापपर्यंत उष्माघाताच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. मागील वर्षी याच कालावधीमध्ये राज्यामध्ये ४० जणांना उष्माघाताचा त्रास झाला होता.
राज्यामध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमान हे ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले असून, पुढील काही दिवसांमध्ये तापमानाचा पारा अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर करण्यात आली आहेत. मात्र राज्यामध्ये मार्चमध्ये उष्माघाताने बाधित झालेल्या ३० रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये बुलढाणा, गडचिरोली व परभणी या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक चार रुग्ण सापडले आहेत. मात्र २२ जिल्ह्यात एकही उष्माघाताचा रुग्ण सापडलेला नाही. मुंबईमध्येही उष्माघाताचा अद्यापपर्यंत एकाही रुग्णांची नोंद झालेली नाही. दरम्यान मागील वर्षी याच कालावधीत राज्यामध्ये ४० जणांना उष्माघाताचा त्रास झाला होता.
गरमीच्या लाटेच्या काळात काळजी घेणेच सर्वात उत्तम उपाय आहे. स्वच्छ पाणी प्या, हलका आहार घ्या, सावलीच्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करा आणि गरज असल्यास वैद्यकीय मदत घ्या. स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, वाढत्या तापमानामुळे सुरुवातीच्या निर्जलीकरण, चक्कर येणे आणि पुरळ येणे असा त्रास होतो. दुपारच्यावेळी घराबाहेर पडणे टाळावे, गरज असल्यास डोके झाकून घ्यावे, असा सल्ला आरोग्य सेवा विभागाचे सहसंचालक डॉ.कैलास बाविस्कर यांनी दिला.
उष्माघाताचे रुग्ण सापडलेले जिल्हे
राज्यात सापडलेल्या उष्माघाताच्या रुग्णांमध्ये बुलढाणा, गडचिरोली व परभणीमध्ये प्रत्येकी ४ रुग्ण सापडले आहेत. नागपूर ३, जालना, लातूर, नाशिक, पालघर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण सापडले आहेत. तसेच नांदेड, उस्मानाबाद, रायगड, सांगली आणि ठाण्यामध्ये प्रत्येकी एक रुग्ण उष्माघाताचा सापडला आहे.
उष्णतेशी संबंधित आजार आणि लक्षणे
- उष्णता लागणे – तीव्र डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास, उलट्या, त्वचा कोरडी पडून घाम येणे बंद होणे, चक्कर येणे, बेशुद्ध अवस्था
- निर्जलीकरण – शरीरात पाण्याची कमतरता, तोंड काेरडे पडणे, कमजोरी, लघवी कमी हाेणे
- उष्णतेचा थकवा – खुप घाम येणे, रक्तदाब कमी हाेणे, अशक्तपणा, हृदयाचे ठोके वाढणे
- उष्माघात – स्नायूंमध्ये वेदना, विशेषत: पाय आणि हातामध्ये