
अहिल्यानगर :
आधुनिक तंत्रज्ञान युगामध्ये डिजिटल शिक्षण आवश्यक असून डिजिटल शिक्षण धोरण स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. ‘डिजिटल स्कूल’ या संकल्पनेअंतर्गत कर्जत तालुक्यातील ८७ व जामखेड तालुक्यातील २४ अशा १११ शाळेतील इंटरॅक्टिव्ह टच पॅनल आणि महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित डिजिटल ई लर्निंग सॉफ्टवेअरचे लोकार्पण सभापती शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्यासह जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते.
सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनेकवेळा ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचा आत्मविश्वास वाढवला आहे. शिक्षण हे तणावमुक्त व सृजनशील असले पाहिजे यावर त्यांनी नेहमीच भर दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल शिक्षणाच्या पर्वाची सुरुवात झाली आहे. त्याला अनुसरूनच ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानातून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य साकारले जाणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सर्व विषयांची उकल अत्यंत सुलभपणे होणार आहे. रंगात्मक आणि चित्रकात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांना विषय समजून सांगता येणार आहेत. फळा, खडू, डस्टर ही संकल्पना नष्ट होत आहे. यापूर्वीही विद्यार्थ्यांना इंटरॅक्युअल बोर्ड, डिजिटल बोर्ड उपलब्ध करुन देण्यात आले असून यानंतरही शाळांना अशाच पद्धतीची शिक्षण व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही सभापती प्रा. शिंदे म्हणाले.
शिक्षक हा शिक्षणाचा आत्मा आहे. शिक्षकांनीही आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणे ही काळाची गरज बनली आहे. शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत त्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कलानुसार शिक्षण देण्याची गरज आहे. सृजनशिलतेला आव्हान आणि प्रोत्साहन देणारे हे स्मार्ट बोर्ड विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारी जादुई खिडकी आहे. डिजिटल युगामध्ये नवीन काय आहे हे विद्यार्थ्याला पहायला, ऐकायला आणि प्रात्यक्षिक करायला मिळाले तर यातून विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा उत्साह वाढून त्यांचे भविष्य या माध्यमातून निश्चितच घडू शकेल, असा विश्वासही सभापती प्रा. शिंदे यांनी व्यक्त केला.