शिक्षण

मुंबई विद्यापीठाची संशोधनामध्ये यशस्वी वाटचाल; ३ पेटंट्स आणि ३ शोधनिबंधासह ५ प्रकल्प तंत्रज्ञानात रुपांतरीत

मुंबई :

मुंबई विद्यापीठ आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेले संशोधन प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत. या दोन्ही संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या १० प्रकल्पांचे विविध निष्कर्ष समोर आले आहेत. यातील ३ प्रकल्पांना पेटंट मंजूर झाले आहेत, तर ३ शोधनिबंध, ३२ शिक्षकांसह १६१ विद्यार्थ्यांना या संशोधनातून लाभ मिळाला आहे. विशेष म्हणजे ४ शेतकऱ्यानाही या संशोधन प्रकल्पांचा लाभ झालेला आहे. तसेच ५ अकुशल कामगारांना प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आले.

निवडक संशोधन प्रकल्प

1. डॉ. मीनल पाटील यांनी रक्तातील हिमोग्लिबिनची पातळी मोजण्यासाठी पोर्टेबल डिवाइस तयार करून पेटंट दाखल केले. या डिवाइसच्या मदतीने रक्तातील एका थेंबापासून हिमोग्लिबिनची पातळी अचूक ओळखता येईल.

2. डॉ. अरुण चांदोरे यांनी दुर्मिळ आणि नष्टप्राय होत असलेल्या रान जांभूळ वनस्पतीच्या संवर्धनाची पद्धत विकसित केली आहे. त्यांनी १२० झाडांची लागवडही केली आहे. औषधी गुणधर्म असलेल्या या वनस्पती पासून त्यांनी पेशींना रंग देण्यासाठी रंगद्रव्य तयार केले. त्यांनी या संशोधनासाठी पेटंट दाखल केले.

3. डॉ. दिलीप यादव यांनी कॅन्सरच्या उपचारांसाठी नागवेल झाडापासुन कँप्टोथेशिम द्रव्य काढण्यासाठी नवीन पद्धत विकसित केली. तसेच प्लांट टिश्यू कल्चर संवर्धन करायची पद्धत विकसित केली. यासाठी त्यांनी पेटंट दाखल केले.

4. डॉ. प्रताप नाईकवाडे यांनी रानकोळी तणापासून खतनिर्मितीची नवीन पद्धत विकसित केली. खताचा पोत आणि गुणधर्म सुधारण्यासाठी त्यांनी नवीन नवीन पद्धत शोधून काढली.

5. डॉ. सपना जाधव यांनी पाण्यापासून हायड्रोजन इंधन निर्मिती साठी लागणारे उत्प्रेरक तयार केले. पाण्याचे विघटन करून इंधनयुक्त हायड्रोजन गॅस तयार करण्यासाठी हे उत्प्रेरक प्रभावी ठरते.

6. डॉ. रोहन गवाणकर यांनी नैसर्गिक रंगनिर्मितीसाठी बुरशीपासून रंग तयार करण्याची पद्धत विकसित केली आहे. विविध प्रकारच्या उद्योगांना नैसर्गिक रंगांची मोठी मागणी आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी व समाजाभिमूख नाविन्यपूर्ण संशोधन करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई विद्यापीठ आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र शासन यांच्यात २५ मे, २०२२ रोजी सामंजस्य करार करण्यात आला होता. या करारान्वये मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकांकडून या प्रकल्पाअंतर्गत विद्यार्थी विकास विभागामार्फत संशोधनासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. या तीन्ही जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयातून १९० प्राथमिक प्रस्ताव विद्यापीठास प्राप्त झाले होते. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १८, रत्नागिरी ६६ आणि पालघर जिल्ह्यातील १०५ संशोधन प्रस्तावांचा समावेश होता. राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या नियमान्वये मुंबई विद्यापीठाने २० जुलै २०२२ रोजी गठीत केलेल्या तज्ज्ञ समिती मार्फत प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्यात आली. तज्ज्ञ समिती मार्फत छाननी केलेल्या २२ संशोधन प्रकल्पांचे प्रकल्प मूल्यांकन समितीपुढे सादरीकरण केल्यानंतर १० संशोधन प्रकल्पांची अनुदानासाठी निवड करण्यात आली होती. या संशोधन प्रकल्पांना ४३ लाख ७४ हजार रुपयाचे अर्थसहाय्य करण्यात आले.

राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगा आर्थिक मदत

राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या या प्रकल्पाअंतर्गत रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यातील स्थानिक गरजा, शेती, पर्यटन, पर्यावरण, आपातकालिन परिस्थिती, नैसर्गिक साधन संपत्ती, वातावरण बदलामुळे शेतीवर होणारे परिणाम, आव्हाने, पाणी समस्या, मत्स्यउत्पादन, फलोत्पादन प्रक्रीया आणि त्यासाठी लागणारी विपणन व्यवस्था अशा अनुषंगिक विषयांवर संशोधन करण्यासाठी आयोगामार्फत अर्थसहाय्य करण्यात आले होते.

या महाविद्यालयांच्या संशोधनाचा समावेश

या संशोधन प्रकल्पांमध्ये डॉ. रोहन गवाणकर (भास्कर वामन ठाकुर महाविद्यालय, विरार), डॉ. प्रताप नाईकवाडे ( न्या. तात्यासाहेब आठल्ये महाविद्यालय, देवरूख), ललिता नेमाडे (गोविंदराव निकम फार्मसी महाविद्यालय, सावर्डे), डॉ. सपना जाधव (सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर), डॉ. भारत ढोकचावळे (सेंट जॉन इन्स्टीट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च पालघर), डॉ. महेश मुदगल (कला- वाणिज्य- विज्ञान महाविद्यालय, जव्हार), डॉ. अरूण चांदोरे (कला- वाणिज्य- विज्ञान महाविद्यालय, मोखाडा), अनघा पाटील (विद्यावर्धिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, वसई) डॉ. मीनल पाटील (एन.बी. मेहता विज्ञान महाविद्यालय, बोर्डी) आणि डॉ. दिलीप यादव (सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर) यांच्या संशोधन प्रकल्पांचा समावेश आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या सर्व संशोधकांनी उत्कृष्ट संशोधन करून अनेक निष्कर्ष समोर आणले असून निश्चितच त्याचा मोठा फायदा समाज जीवन सुसह्य करण्यासाठी तसेच मानवी कल्याणासाठी होणार असल्याचा आशावाद मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केला. तसेच या संशोधन प्रकल्पांना पाठबळ दिल्याबद्दल राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र शासन आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, सदस्य सचिव डॉ. नरेंद्र शाह, सल्लागार डॉ.अरुण सप्रे आणि वैज्ञानिक अधिकारी डॉ. दिनेश जगताप यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *