
मुंबई :
शंभूराजे फ्रेंड्स सर्कल, कोल्हापूर आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुण्याच्या सागर वाघमारे व ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरला अग्र मानांकन देण्यात आले आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा हौशी कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने १२ ते १४ एप्रिल २०२५ दरम्यान हि स्पर्धा गंगा भाग्योदय सांस्कृतिक हॉल, मेन रोड, कसबा बावडा, कोल्हापूर येथे रंगणार आहे.
पुरुष एकेरी गटात १३४ तर महिला एकेरी गटात २६ खेळाडूंनी भाग घेतला असून १२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता विधान परिषदेचे आमदार माननीय सतेज पाटील यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात येणार आहे. यानंतर पुरुष एकेरी गटाने सामन्यांना सुरुवात होईल. महिला एकेरी गटाचे सामने १३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजल्यापासून खेळविण्यात येतील. या स्पर्धेतील उपउपांत्य फेरी पासूनचे सामने तसेच इतर महत्वाचे सामने महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चनलवरून लाईव्ह दाखविण्याची व्यवस्था महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने केले आहे. शिवाय या सामन्यांचे मराठी, हिंदी आणि इंग्रजीमधून धावते समालोचन करण्यात येणार आहे. योगेश परदेशी व प्रशांत मोरे या विश्व विजेत्यांसह महाराष्ट्रातील अनेक आंतर राष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर नैपुण्य प्राप्त केलेल्या पुरुष आणि महिला खेळाडूंचा खेळ कोल्हापूरकराना जवळून पाहण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे.
स्पर्धेतील मानांकने
पुरुष एकेरी : १) सागर वाघमारे ( पुणे ), २) अनिल मुंढे ( पुणे ), ३) प्रशांत मोरे ( मुंबई ), ४) पंकज पवार ( ठाणे ), ५) विकास धारिया ( मुंबई ), ६) संजय मांडे ( मुंबई ), ७) योगेश परदेशी ( पुणे ), ८) हरेश्वर बेतवंशी ( मुंबई )
महिला एकेरी : १) समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ), २) आकांक्षा कदम ( रत्नागिरी ), ३) मधुरा देवळे ( ठाणे ), ४) प्राजक्ता नारायणकर ( मुंबई उपनगर ), ५) दिक्षा चव्हाण ( सिंधुदुर्ग ), ६) रिंकी कुमारी ( मुंबई ), ७) केशर निर्गुण ( सिंधुदुर्ग ), ८) अंबिका हरिथ ( मुंबई )