
मुंबई :
तालुका क्रीडा संकुल पोलादपूरसाठी आरक्षित जागेची पाहणी करून संकुलासाठी जागा संपादित करण्याची कार्यवाही करण्यात यावी. माणगाव, महाड येथील क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या कार्यवाहीस गती देण्याचे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
रायगड येथील पोलादपूर, महाड, माणगाव येथे तालुका क्रीडा संकुल उभारण्यासंदर्भातील कामकाजाचा आढावा मंत्री श्री. भरणे यांनी घेतला. यावेळी रोजगार हमी योजना, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, विभागाचे उपसचिव सुनिल पांढरे, उपसंचालक नवनाथ फरताडे, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ आदी उपस्थित होते.
मंत्री भरणे म्हणाले की, माणगाव येथील क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी बहुउद्देशीय सभागृहात बॅडमिंटन कोर्टसह चेंजिंग रूम व प्रसाधनगृह, बंदिस्त प्रेक्षागृह, बॅडमिंटन कोर्ट, धावनमार्ग, विविध खेळाचे मैदान अद्ययावत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच महाड क्रीडा संकुलाची डागडुजी करण्यात यावी. अद्ययावत टर्फचे फुटबॉल, क्रिकेट मैदान व त्या परिसरातील प्रचलित असलेल्या खेळांच्या क्रीडांगणांसाठीची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.