
मुंबई :
कामा रुग्णालयामधील कृत्रिम गर्भधारणा केंद्राच्या (आयव्हीएफ) पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेल्या सहायक प्रजनन केंद्रांतर्गत आययूआयला वर्षभरात जोडप्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यापाठोपाठ आता रुग्णालयामध्ये दुसऱ्या टप्प्यात आयव्हीएफ पद्धत सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या पद्धतीलाही जोडप्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मागील काही दिवसांमध्ये तब्बल ८० जोडप्यांनी आयव्हीएफ पद्धतीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेसाठी नोंदणी केली आहे.
गर्भधारणेसाठी अक्षम असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व उपचार देता यावेत, यासाठी ६ मार्च २०२४ रोजी कामा रुग्णालामध्ये कृत्रिम गर्भधारणा केंद्र सुरू करण्यात आले. वंधत्वावर उपचार करणारे कामा आणि अल्ब्लेस रुग्णालय हे राज्यातील पहिले सरकारी रुग्णालय ठरले. कृत्रिम गर्भधारणा केंद्राची सुरुवात टप्प्याटप्यांमध्ये झाली. पहिल्या टप्प्यामध्ये सहाय्यक प्रजनन केंद्र सुरू करून त्यामध्ये आययूआय ही सुविधा उपलब्ध करण्यात आली. आययूआय या सुविधेमळे १२ जोडप्यांचे माता-पिता होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यातील या यशानंतर आता कामा रुग्णालयामध्ये आयव्हीएफ केंद्राच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू आहे. या दुसऱ्या टप्प्यामध्ये आयव्हीएफ प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे वंधत्व असलेल्या जोडप्यांना याचा अधिक लाभ होणार आहे. कामा रुग्णालयात दररोज २० ते ३० रुग्ण गर्भधारणेच्या समस्यांशी संबंधित उपचारासाठी येत आहेत. कृत्रिम गर्भधारणा उपचार हे महागडे असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे कामा रुग्णालयातील केंद्राला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कामा रुग्णालयामध्ये सुरू करण्यात येणाऱ्या या दुसऱ्या टप्प्यातील आयव्हीएफच्या प्रक्रियेसाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी पालघर व रायगड या भागातील जवळपास ८० जोडप्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली.
खासगी रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्च
खाजगी रुग्णालयामध्ये कृत्रिम गर्भधारणेसाठी आकारला जाणारा खर्च लाखो रुपयांमध्ये असल्याने सर्वसामान्यांना तो परवडणारा नसतो. त्यामुळे कामा रुग्णालयात कृत्रिम गर्भधारणा केंद्राच्या पहिल्या टप्प्यात सुरू केलेले ‘गर्भाशयात गर्भाधान’ हे आशेचा किरण ठरले आहे. या केंद्रामध्ये रुग्णांना मोफत किंवा माफक दरात उपचार केले जात आहेत. वंध्यत्वाचे वाढते प्रमाण लक्षात घेता हे केंद्र अनेक महिलांना मातृत्वाचा आनंद मिळवून देण्यात यशस्वी ठरेल, असे कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.