
मुंबई :
मुंबईसह ठाणे रायगड व पालघर जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मार्च पेड एप्रिलचे वेतन १० तारीख उजाडली तरी अद्याप झालेले नाहीत. त्यामुळे शिक्षकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
मुंबई ठाणे नवी मुंबई रायगड व पालघर जिल्ह्यातील शिक्षकांचे अद्याप वेतन झाले नसल्याने त्यांच्यासमोर बिकट परिस्थिती उभी राहिली आहे. शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला होते. मात्र एप्रिल महिन्याची १० तारीख उलटली तरी वेतन झाले नाही. त्यामुळे शिक्षकांना गृहकर्जाचे हप्ते, विमा व इतर कपातीचे हप्ते भरता येत नसल्याने बँका व इतर कंपन्याकडून दंड आकारण्याची शक्यता असल्याने शिक्षक आर्थिक कत्रित सापडला आहे. त्यामुळे शिक्षकांचे वेतन तातडीने करण्याची मागणी मुंबई मराठी अध्यापक संघांचे अध्यक्ष व भाजपा प्रदेश कार्यकरणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी केली आहे
२०१५ च्या शासन निर्णयानुसार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी
शाळांनी वेतन देयके विहित करण्यात आलेल्या कालावधीत सादर केल्यास अशा शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन १ तारखेला अदा करण्यात यावे, तसे न झाल्यास संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरावे व आवश्यकता पडल्यास अधिकाऱ्यांविरोधात विभागीय चौकशी करण्यात यावी असे निर्देश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १३ ऑगस्ट २०१५ रोजी शासन परिपत्रक काढून दिले आहे. परंतु शालेय शिक्षण विभागाने या परिपत्रकाला केराची टोपली दाखविली असल्याचा आरोप अनिल बोरनारे यांनी केला आहे. या परिपत्रकानुसार आतापर्यंत किती अधिकाऱ्यांची चौकशी केली असा सवालही अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षण विभागाला केला आहे. मार्च महिन्याचे वेतन अजूनही न झाल्याने शिक्षकांचे गृहकर्ज, विमा व इतर कपातीचे धनादेश न वटल्याने संबंधित बँक व कंपन्यांकडून दंड आकारला जात असून मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.