
मुंबई :
१४ एप्रिल २०२५ चा संच निर्धारणच्या शासन निर्णयानुसार राज्यातील दिवस शाळा व रात्र शाळा ४० टक्के शाळा बंद पडणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शिक्षक परिषदेचे वतीने दौरा पूर्ण केला असता १४ एप्रिल शासन निर्णयानुसार अंदाजे ६०० ते ७०० शिक्षक व मुंबईतील रात्र शाळेतील जवळपास १०० ते १५० पदे अतिरिक्त होणार आहेत.
रात्र शाळेतील विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या बाबत शासन निर्णय 8.12.2022 नुसार शासनाने एक समिती स्थापन केली होती. त्या समितीचा अहवाल शासनाकडे येऊनही रात्र शाळेतील समस्यांबाबत शासनाने व सरकारने अडीच वर्षे काळ पूर्ण झाला तरीही अजून धोरणात्मक निर्णय घेतला नाही. त्यामुळे रात्र शाळेतील पट संख्या कमी झाली आहे. शाळेत शिक्षक नाहीत व मुख्याध्यापक, लिपिक व शिपाई पदे अतिरिक्त झाले आहेत. सरकार रात्र शाळा बंद करू पाहत आहे. रात्र शाळेतील गोरगरीब कष्टकरी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी शासनाची व सरकारची तळमळ दिसून येत नाही असेच एकंदर दिसून येत असल्याचे निरंजन गिरी यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने दिवस शाळा व रात्र शाळेतील शिक्षकांना होणाऱ्या त्रासाबद्दल आंदोलन छेडले आहे, सर्व शिक्षकांनी बाहेर पडा व आंदोलनात सहभागी व्हा असे आव्हान प्रातांध्यक्ष वेणूनाथ कडू, राज कुमार बोनकिले, कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, कार्यालय मंत्री निरंजन गिरी, किरण भावठाणकर, आमदार भगवानराव साळुंखे तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अन्य पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.