
मुंबई :
विनापरवाना सौंदर्य उत्पादने करणाऱ्या व त्याची विक्री करणाऱ्या मे. व्हि.डी. हेल्थकेयर आणि मे. नरेंद्र मार्केटिंग या दोन कंपन्यांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) छापे टाकले. या छाप्यामध्ये तब्बल ३ लाख ४७ हजार १६० रुपये किमतीचे सौंदर्य प्रसाधने जप्त करण्यात आली. यावेळी कंपनी अन्न परवानाच्या माध्यमातून कच्च्या मालाची खरेदी करून औषधाची तीन उत्पादने तयार करत असल्याचे आढळले. मात्र कंपनीकडून कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन होत असतानाही एफडीएकडून कंपनीविरोधात एफआयआर दाखल करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
भिवंडीतील खापरिया बाबा कम्पाऊंड येथील गाळा क्रमांक २०१ मध्ये असलेली व्हि.डी. हेल्थकेयर ही कंपनी विना परवाना सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करत आहे. तर या उत्पादित सौंदर्य प्रसाधानाची विक्री याच कंपाऊंडमध्ये गाळा क्रमांक १०२ मध्ये असलेली मे. नरेंद्र मार्केटिंग या कंपनीकडून विक्री करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई कार्यालयाच्या गुप्तवार्ता विभागास मिळाली. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (गुप्तवार्ता) वि.आर.रवि, रत्नागिरीतील सहायक आयुक्त (गुप्तवार्ता कोकण विभाग) शशिकांत यादव आणि ठाण्यातील औषध निरीक्षक शुभांगी भुजबळ यांनी ३ एप्रिल रोजी खापरिया बाबा कम्पाऊंड येथील या कंपन्यांना भेट देऊन त्यांची तपासणी केली. या तपासणीवेळी मे. व्हि.डी. हेल्थकेयर येथे ‘एन.एम. रोगान बदाम शिरीन मिठा बादाम तेल’ या उत्पादनाचे उत्पादन सुरू हाते. त्यावर लावण्यात आलेल्या आवरणावर सौंदर्य प्रसाधन असे नमूद करण्यात आले होते. तसेच उत्पादनाच्या आवरणावर अन्न पदार्थ नोंदणीकरण क्रमांक सुद्धा नमूद करण्यात आला होता. मात्र त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे औषध निरीक्षक शुभांगी भुजबळ यांनी उत्पादन सुरू असलेल्या सौंदर्य प्रसाधनाचा नमूना तपासणीसाठी घेऊन उर्वरित सर्व साठा जप्त केला. तसेच तेथे असलेले अन्य सौंदर्य प्रसाधनाचे पॅकिंग व आवरणाचे साहित्यही जप्त करण्यात आले. मे. व्हि.डी. हेल्थकेयर या कंपनीवर कारवाई केल्यानंतर मे. नरेंद्र मार्केटिंग या कंपनीला भेट दिली. त्यावेळी तेथे मे. व्हि.डी. हेल्थकेयर यांनी उत्पादित केलेल्या ‘एन.एम. ओनिअन हेयर ऑईल’ व ‘मुलतानी माटी पावडर’ हे दोन सौंदर्य प्रसाधने आढळले, त्याचे ही नमुने घेऊन उर्वरित साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर, सह आयुक्त (दक्षता) डॉ. राहुल खाडे, ठाण्याचे सहआयुक्त नरेंद्र सुपे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली.
न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे एफआयआर करण्यास टाळाटाळ
मे. व्हि.डी. हेल्थकेयर या कंपनीकडे औषध बनविण्याचा परवाना नसला तरी कंपनीकडे अन्न परवाना होता. या परवान्याच्या आधारे ते कच्च्या मालाची खरेदी करत होते. या खरेदी केलेल्या कच्च्या मालाच्या माध्यमातून तीन प्रकारचे औषधे बनविण्यात येत होते. यातून कायद्याचे स्पष्ट उल्लंघन करण्यान होत असतानाही त्या कंपनीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही. दरम्यान औषध उत्पादन व विक्रीबाबतचा तपास हा औषध निरिक्षकांकडूनच करण्यात यावा. यामध्ये पोलिस कोणत्याही प्रकारचा तपास करू शकत नाही. असे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने २०२० मध्ये दिले होते. यामुळे मे. व्हि.डी. हेल्थकेयर या कंपनीकडून कायद्याचे उल्लंघन होत असतानाही एफआयआर दाखल केला नसल्याचे एफडीएकडून सांगण्यात आले.