
मुंबई :
९ ते १२ एप्रिल २०२५ दरम्यान पूर्णप्रांज्या महाविद्यालय उडपी, मेंगलोर विद्यापीठ येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ खो-खो स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाच्या पुरुष संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने रौप्य पदकाची कमाई केली आहे.
मुंबई विद्यापीठ पुरुष खो-खो संघाने साखळी सामन्यात दावणगिरी विद्यापीठाचा दोन गडी राखून पराभव केला. तसेच अमृतसर विद्यापीठाचा सहा गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर किट विद्यापीठ भुवनेश्वर या विद्यापीठाचा एक गुण व आठ मिनिटं राखून पराभव केला व उप उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. उप उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये दिल्ली विद्यापीठ दिल्ली या संघाबरोबर झालेल्या अतिशय रोमहर्षक सामन्यात सलग दोन वेळा बरोबरीत सामना झाला, व त्या नंतर लघुत्तम आक्रमणामध्ये (suddun death) मुंबई विद्यापीठाने एक गुणांनी विजय प्राप्त केला व मुंबई विद्यापीठाच्या संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
उपांत्य फेरीमध्ये सुद्धा अटीतटीच्या लढतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठाचा एक गुणांनी पराभव करून अंतिम सामन्यांमध्ये दिमाखात प्रवेश केला. अंतिम सामना मेंगलोर विद्यापीठ बरोबर खेळण्यात आला व या अंतिम सामन्याच्या अटीतटीच्या लढतीत शेवटच्या काही सेकंदात एक गुणांनी निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागत रौप्यपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत देशभरातील १६ विद्यापीठांचे संघ सहभागी झाले होते.
मुंबई विद्यापीठाचा आकाश कदम ठरला उत्कृष्ट खेळाडू
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ खो खो पुरुष संघाचा उत्कृष्ट खेळाडूचा किताब मुंबई विद्यापीठाचा खेळाडू आकाश कदम यास देण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या या संघामध्ये प्रथमेश दुर्गावळे, धीरज भावे, अभय रत्नाकर, सुजल जायगडे, आदित्य कांबळे, वैभव मोरे, आकाश कदम, शुभम जाधव, संदेश सकपाळ, हर्ष कामठेकर, ओमकार मिरगळ, संकेत जाधव, राऊळ जावळे, निखिल कदम, मयुरेश मोरे या खेळाडूंचा सहभाग होता. या संघाला दलेश देसाई व शशांक उपशेटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कुलगुरूंकडून खेळाडूंचे अभिनंदन
पुरुष खोखो संघाने स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र.कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ मनोज रेड्डी यांचे मार्गदर्शन लाभले.