आरोग्य

दोन वर्षांपर्यंत मलविसर्जन करू न शकलेल्या बाळावर ग्लेनईगल्स हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार

मुंबई :

जन्मजात हिर्शस्प्रंग आजाराने पिडीत दोन वर्षांच्या बाळावर ग्लेनईगल्स हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले. हिर्शस्प्रंग आजार (Hirschsprung’s disease) हा एक जन्मजात विकार , ज्यात मोठ्या आतड्याच्या (कोलन) काही भागांमध्ये मज्जातंतू पेशी तयार झालेल्या नसतात. यामुळे आतड्याची योग्य हालचाल होत नाही आणि त्यामुळे मल बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो. यावरील उपचाराकरिता वापरण्यात आलेली पीईआर-रेक्टल एंडोस्कोपिक मायोटॉमी (PREM) ही दुर्मिळ प्रक्रिया असून ती यशस्वीरित्या पार पाडणारे शहरातील हे पहिले रुग्णालय ठरले आहे.

जन्मापासूनच या बालरुग्णाला नैसर्गिकरित्या मलविसर्जन करता येत नव्हते. हिर्शस्प्रंग आजारामुळे दोन वर्षांहून अधिक काळ हे बाळ रोजच एनीमावर अवलंबून होते. अखेर ग्लेनईगल्स हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या यशस्वी उपचारानंतरत आता हे बाळ सामान्य जीवन जगत आहे. उपचारानंतर आता त्याला कोणत्याही प्रकराची पोटदुखी, सूज आलेली नाही किंवा बाहेरील बाजूस कोणत्याही प्रकारचे टाके पडलेले नाहीत तसेच यापुढे त्याला कोणत्याही वैद्यकीय उपचाराची आवश्यकता भासणार नाही.

वैद्य (नाव बदलले आहे) या जोडप्याचे पहिले अपत्य आर्यन (नाव बदलले आहे) याच्या जन्माने ते दोघेही खूप आनंदी होते. मात्र हे बाळ एक महिन्याचे झाल्यावर, असे लक्षात आले की ते तीव्र अशा बद्धकोष्ठतेच्या समस्येशी झुंजत आहे. तो आठ दिवसांपर्यंत मलविसर्जन करू शकत नव्हता. नाशिक येथील त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी अनेक औषधे आणि दररोज एनीमा देऊनही, त्याच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. त्याचे पोट अनेकदा गॅसमुळे फुगले आणि वजन मात्र कमीच राहिले. या कुटुंबाने डिसेंबर २०२४ मध्ये बाळावर उपचाराकरिता नाशिकहून मुंबईकडे धाव घेतली. डॉ. विभोर बोरकर यांचा सल्ला घेतला ज्यांनी या बाळ हिर्शस्प्रंगचा आजार असल्याचा संशय व्यक्त केला. बेरियम एनीमा, एंडोस्कोपी बायोप्सी आणि मॅनोमेट्री सारख्या काही निदान चाचण्यांमुळे परळ मुंबईतील ग्लेनईगल्स हॉस्पिटलमध्ये याचे अचुक निदान झाले.

बालरोग गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. विभोर बोरकर सांगतात की, मोठ्या आतड्याच्या खालच्या भागात असलेल्या मज्जातंतू पेशी (गॅंग्लियन पेशी) विकसित होण्यास होत नाही तेव्हा हिर्शस्प्रंग आजार होतो, ज्यामुळे मल साचून राहतो त्यामुळे दीर्घकालीन बद्धकोष्ठता होते. हिर्शस्प्रंग आजार हा ५,००० ते १०,००० मुलांपैकी एकाला प्रभावित करतो. या स्थितीसाठी कोणतेही वैद्यकीय व्यवस्थापन गरजेचे नसून संसर्गामुळे काहीवेळा ते जीवघेणे देखील ठरू शकते. अगदी लहान बाळांमध्ये पहिल्या हिरव्या रंगाच्या (मेकोनियम) मलास विलंब उशीर होणे हे देखील एक प्रारंभिक लक्षण असू शकते. मोठ्या मुलांना सहसा पोटाला सूज येणे, उलट्या होणे, वजन न वाढणे आणि सतत बद्धकोष्ठता तर, काहींना संसर्ग होऊ शकतो. प्रभावी उपचारांसाठी खुली शस्त्रक्रिया किंवा लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रियेचा वापर करुन आतड्याचा प्रभावित भाग काढून पुन्हा जोडला जातो. मात्र, या बाळ्याच्या बाबतीत पीईआर-रेक्टल एंडोस्कोपिक मायोटोमी (PREM) नावाची दुर्बीणीद्वारे केली जाणारी प्रक्रिया करण्यात आली. या यशस्वी प्रक्रियेनंतर हे मूल लक्षणांपासून मुक्त असे निरोगी आयुष्य जगत आहे. बाळावर योग्य वेळी उपचार न केल्यास त्याला भविष्यात संसर्ग आणि वजन न वाढणे यासारख्या गुंतागुंत होऊ शकतात. जरी ही जन्मजात स्थिती असली तरी, प्रसूतीपूर्व याचे निदान करणे अत्यंत अवघड आहे आणि बाळाला जन्मानंतरच त्यासंबंधी लक्षणे दिसून येतात.

इंटरव्हेंशनल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. शंकर झंवर यांनी सांगितले की, मुलाला हिर्शस्प्रंग नावाचा जन्मजात आजार होता, ज्यामध्ये आतड्याच्या शेवटच्या भागात आवश्यक नसा, पेशींचा अभाव असतो आणि त्यामुळे मल बाहेर पडण्यास अडथळे येतात. परिणामी ब्लॉक झालेल्या पेशींवर दबाव निर्माण होतो. जेव्हा मूल नाशिकहून मुंबईत आमच्याकडे उपचाराकरिका आले तेव्हा ते अत्यंत अस्वस्थ होते, त्याचे पोट सुजलेले होते आणि ते दररोज एनीमाशिवाय मल विसर्जन करु शकत नव्हते. निदानानंतर आम्ही पीईआर-रेक्टल एंडोस्कोपिक मायोटोमी (PREM) नावाच्या प्रगत एंडोस्कोपिक तंत्राचा वापर करून मुलावर यशस्वी उपचार केले. ही प्रक्रिया भूल देऊन केली जाते. याकरिता डॉ. आदित्य प्रभुदेसाई आणि डॉ. धनश्री कारखानीस यांचे विशेष सहकार्य लाभले. ही संपूर्ण प्रक्रिया एंडोस्कोपिक पद्धतीने केली जाते जिथे रुग्णाच्या गुदद्वाराच्या आत एक लहान छिद्र केले जाते. त्यातून आतड्याचा एक निष्क्रिय भाग ज्यामध्ये नसा नसतात तो आतील बाजूने कापण्यात आला. ही प्रक्रिया एंडोस्कोपिक पद्धतीने केली जात असल्याने शरीराच्या पृष्ठभागावर कोणतेही व्रण अथवा जखम झाली नाही आणि प्रक्रियेनंतर रुग्णाला वेदनारहित आयुष्य जगत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सुमारे ३ तास चालली. या प्रक्रियेमुळे
पारंपारिक पध्दतीने ओपन सर्जरी न करता ही स्थिती व्यवस्थापित करता आली. जागतिक स्तरावर, अशा प्रकारच्या केवळ १३ प्रक्रिया नोंदवल्या गेल्या आहेत आणि मुंबई शहरात अशा पद्धतीने उपचार केला हा पहिलाच प्रकार आहे.ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत या चिमुरड्याला घरी सोडण्यात आले. आता त्याला कधीच एनीमाची आवश्यकता भासणार नाही. त्याचे पोट आता फुगलेले वाटत नाही. तो आता सामान्यपणे मलविसर्जन करतो. या प्रक्रियेमुळे त्याचे आयुष्य खरोखरच बदलले आहे आणि तो निरोगी जीवन जगू शकत आहे.

माझा मुलगा आर्यन जन्मानंतर बरा होता. मात्र एक वर्षानंतर त्याला बद्धकोष्ठतेचा त्रास आणि वेदना सतावू लागल्या. डॉ. विभोर यांचा सल्ला घेतल्यानंतर बायोप्सीमध्ये हिर्शस्प्रंग नावाचा आजार असल्याचे निदान झाले. यशस्वी उपचारानंतर, माझा मुलगा आता पूर्णपणे बरा झाला आहे आणि कोणत्याही अडचणीशिवाय तो मलविसर्जन करु शकतो. वेळीच उपचार केल्याबद्दल आम्ही डॉ. विभोर आणि डॉ. शंकर यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया रुग्णाच्या कुटुंबियांनी व्यक्त केली. ग्लेनईगल्स हॉस्पिटलमध्ये, आम्ही प्रत्येक रुग्णाला शक्य तितक्या उच्च दर्जाचे उपचार मिळावी याची खात्री करतो. या प्रकरणात PREM प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडणे, जी एक दुर्बीणीद्वारे केली जाणारी प्रक्रिया असून त्याने कोणतीही जखम होत नाही. जन्मापासूनच त्रास सहन करणाऱ्या बाळासाठी हा एक उत्तम उपाय ठरला आहे. या शस्त्रक्रियेचे यश हे आमच्या येथे करण्यात येणाऱ्या बालरोग उपचारांमधील एक उत्तम उदाहरण ठरले आहे अशी प्रतिक्रिया ग्लेनईगल्स हॉस्पिटल मुंबईचे सीईओ डॉ. बिपिन चेवाले यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *