आरोग्य

मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधार, रोबोटिक शस्त्रक्रियेने वाचले तरुणीचे प्राण

मुंबई :

माझी पूजा वाचली… मला सगळं जग जिंकल्यासारखं वाटतंय! ही भावना एका आईने व्यक्त केली आहे. अतिशय अवघड असणारी शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्यानंतर, अमरावती जिल्ह्यातील खडकपूर गावात राहणाऱ्या एका आईच्या डोळ्यांत अश्रू आणि चेहऱ्यावर हसू होतं. तिच्या मुलीला जीवदान दिल्याबद्दल आईने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कक्षप्रमुख रामेश्वर नाईक, आणि मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचे लेखी पत्राद्वारे आभार मानले आहेत.

पूजा रामलाल रसाळे, वय २१. ही गरीब कुटुंबातील मुलगी. आर्थिक परिस्थिती हालाकीची, पोटाची खळगी भरणं अवघड, त्यात मुलीला किडनीशी संबंधित गंभीर आजार जडला. उजव्या किडनीतील दुर्धर आजार आणि खासगी रुग्णालयांच्या भरमसाठ फी ची रक्कम ऐकून तिच्या घरच्यांचा जीव घाबरला. उपचारासाठी मोठी रक्कम लागणार होतीच, त्याशिवाय शस्त्रक्रिया अतिशय किचकट असल्याने अनेक डॉक्टरांनी ती करण्यास नकार दिला होता.

निराशेच्या अंधारात दिसला आशेचा किरण

हतबल झालेल्या कुटुंबीयांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली.पुढे पूजाच्या पालकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी संदर्भात माहिती मिळाली. अमरावती येथील जिल्हास्तरीय मदत कक्षाशी संपर्क साधल्यावर पुढील मदतीचे आणि उपचाराचे मार्ग कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांच्या प्रयत्नातून मोकळे झाले.

पूजावर यशस्वी ‘रोबोटिक शस्त्रक्रिया’

पूजाच्या तपासणीतून आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला वर्धा, सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इथे पूजावर अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, किडनीत झालेल्या अडथळ्यावर रोबोटिक प्रणालीच्या सहाय्याने यशस्वीरीत्या पार पडली. डॉक्टरांनी तिचा जीव वाचवला, आणि आता पूजा हळूहळू बरी होत आहे.

आम्ही आयुष्यभर ऋणी

आमच्या जगण्याचा आधार म्हणजे आमची एकुलती एक लेक पूजा! तिच्या उपचारासाठी निधी उपलब्ध करून देणारे मुख्यमंत्री, त्यांच्यासोबतच कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक आणि सर्व डॉक्टरांचे मी आयुष्यभर ऋणी राहीन, अशी भावनिक प्रतिक्रिया पूजाच्या आईने लेखी पत्राद्वारे व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *