
मुंबई :
एसटीत वाहकाने प्रवासी उत्पन्न कमी आणले तर त्याच्यावर लगेच कारवाई करण्यात येते, मात्र एप्रिल महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत भाडेवाढीच्या पटीत अपेक्षित उत्पन्न प्रतिदिन सरासरी ३३ कोटी ६० लाख इतके मिळायला हवे होते. पण प्रत्यक्षात मात्र २६ कोटी रुपये इतके उत्पन्न सरासरी प्रतिदिन मिळाले आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटीला सक्षम करायचे असेल तर अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याची जबाबदारी निश्चित करण्यात यावी व बेजबाबदार, कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सरकारकडे केली आहे.
एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कोणतेही व्हिजन राबविले जात नसून प्रशासनाकडून परिपत्रके काढली जातात पण त्यातून काय फलनिष्पत्ती झाली याचा आढावा घेतला जात नाही. डिसेंबर महिन्यात प्रशासनाने परिपत्रक काढून पंचसूत्री जाहीर केली. त्यात जानेवारी २५ ते मार्च २५ या कालावधीत उत्पन्न वाढ करण्यासाठी काही उपाययोजना घालून देण्यात आल्या. त्याला आता तीन महिने पूर्ण झाले तरी त्यातून आतापर्यंत काय फलनिष्पत्ती झाली यावर कुठल्याच स्थरावर बैठक झाली नसून आमच्या माहितीप्रमाणे पंचसूत्रीत ठरवून देण्यात आल्याप्रमाणे विद्यार्थी पास संख्या वाढली असून उदिष्ट ठरवून दिल्या प्रमाणे १०० कोटीं रुपये उत्पन्न मिळाल्याचे दिसत आहे. अजूनही काही आगारात स्वच्छतेची प्रगती म्हणावी तशी दिसत नाही. गाड्या जुन्या झाल्या असतानाही मार्गबंद गाड्यांचे प्रमाण मात्र कमी झाल्याचे दिसून येत आहे. पण ज्या उद्देशाने ही पंचसूत्री जाहीर करण्यात आली त्याचा मुख्य उद्देश उत्पन्न वाढ असून त्यात अपेक्षित सफलता मिळालेली दिसत नाही. पंचसूत्रीला वजन प्राप्त करण्यासाठी परिपत्रकात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला असून कमी उत्पन्नाला परिवहन मंत्र्यांना जबाबदार धरायचे का? असा सवाल उपस्थित करून ते म्हणाले की, १४.९५ टक्के भाडेवाढ करूनही त्या पटीत उद्दिष्टांच्या प्रमाणे उत्पन्न मिळालेले दिसत नाही. त्यामुळे मंत्र्यांचीही बदनामी होत असून त्यांनी आता स्वतः लक्ष घालून एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न न करता नुसते टोपल्या टाकू काम करणाऱ्या सबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई केली पाहिजे असेही बरगे यांनी या म्हटले आहे.
या महिन्यातही पी एफ, ग्रॅजुटी, बँक, एल आय सी, वैद्यकीय बिले ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केली असून ती संबधित संस्थांना देण्यात आलेली नाही. हा विश्वासघात असून कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. पी एफ व ग्रॅजुटीची आतापर्यंत २८०० कोटी रुपये इतकी रक्कम थकली असून ती देणार कशी? असा प्रश्न उपस्थित होत असून आर्थिक स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली असल्याचेही निदर्शनास येत आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी कृती कार्यक्रम घ्यावा. पंचसूत्रीत विद्यार्थी पासेस संख्येत वाढ होण्यासाठी प्रत्येक शाळेत जाऊन स्वतः पास देण्याची योजना महामंडळाने राबवली, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून विद्यार्थी पासेसमधून अतिरिक्त १०० कोटी रुपये इतके उत्पन्न मिळाले. याचाच अर्थ उद्दिष्ट ठरवून दिल्यास चांगले काम होऊ शकते. म्हणून एसटीच्या सहाही विभागांना प्रवाशी उत्पन्न वाढीचे सुद्धा निश्चित उद्दिष्ट ठरवून दिले तरच अपेक्षित उत्पन्न मिळेल अशी आशाही बरगे यांनी व्यक्त केली आहे.