शिक्षण

नव्या शैक्षणिक वर्षापासून नवे शैक्षणिक धोरण; चार टप्प्यांमध्ये अंमलबजावणी

मुंबई :

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची अंमलबजावणी शालेय शिक्षणात यंदापासून होणार आहे. जूनपासून होत असलेल्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीसाठी नवा अभ्यासक्रम असणार आहे. हे शिक्षण धोरण २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून चार टप्प्यांत विविध वर्गांना लागू होईल. याबरोबरच मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य असणार आहे. शालेय शिक्षण विभागाने बुधवारी शासन निर्णय काढून स्पष्ट केले आहे.

एनईपीची अंमलबजावणी पदवी अभ्यासक्रमासाठी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून सुरू झाली होती. यंदा शालेय शिक्षणात लागू होणार आहे. एनसीईआरटीच्या धर्तीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) राज्य अभ्यासक्रम आराखडाही तयार केला. आता प्राथमिक आणि माध्यमिक असे विभाग राहणार नसून त्याऐवजी पायाभूत, पूर्वतयारी, पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक अशा चार स्तरांमध्ये इयत्तांची विभागणी करण्यात आली आहे. तीन ते आठ वर्षांपर्यंत म्हणजेच इयत्ता दुसरीपर्यंत पायाभूत स्तर असेल. त्या नंतर तिसरी ते पाचवी या इयत्तांचा समावेश पूर्वतयारी स्तरात असेल. सहावी, सातवी आणि आठवी या तीन इयत्ता पूर्व माध्यमिक स्तरात असतील आणि नववी ते बारावीपर्यंत माध्यमिक स्तर गणला जाणार आहे. एससीईआरटी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या आधाराने तयार केलेला राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ लागू होईल. या आराखड्यानुसार शैक्षणिक क्षमता निश्चिती करण्यात आली असून त्यादृष्टीने आता पाठ्यपुस्तके तयार झाली आहेत.

यंदा पहिलीला नवीन पुस्तके या नव्या धोरणानुसार असणार आहेत. २०२६-२७ म्हणजेच पुढल्या शैक्षणिक वर्षात दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी या इयत्तांच्या अभ्यासक्रमात बदल होईल. त्यानंतर इयत्ता पाचवी, सातवी, नववी आणि अकरावी या चार वर्षांचा अभ्यासक्रम तिसऱ्या टप्प्यात म्हणजे २०२७-२८ मध्ये बदलणार आहेत. अंतिम टप्प्यात म्हणजेच २०२८-२९ मध्ये आठवी, दहावी आणि बारावी या इयत्तांची पुस्तके बदलणार आहेत.
भाषा धोरणानुसार, मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी भाषा तिसऱ्या भाषेप्रमाणे शिकवली जाणार आहे. इतर माध्यमांमध्ये माध्यम भाषा, मराठी आणि इंग्रजी या तीन भाषा अभ्यासक्रमात असणार आहेत. तर इयत्ता सहावी ते दहावी साठी भाषा धोरण हे राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार निश्चित केले जाईल असेही या निर्णयात स्पष्ट केले आहे.

नवीन अभ्यासक्रम लागू करताना, पहिल्यांदाच त्या अभ्यासक्रमात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमातून नव्या अभ्यासक्रमात समरस होणे सुलभ होईल. हा सेतू अभ्यासक्रम देखील एससीईआरटीमार्फत तयार होणार आहे. शालेय वेळापत्रक, विषययोजना, मूल्यांकन पद्धती आणि परीक्षांचे वेळापत्रक यामध्येही आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार आहेत. संपूर्ण शैक्षणिक वर्षाचे नियोजन एससीईआरटी च्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात येणार असून ते शाळांना जूनपूर्वी दिले जाणार आहे.

नवीन अभ्यासक्रम असा टप्प्याटप्प्याने

२०२५-२६: पहिली
२०२६-२७: दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी
२०२७-२८: पाचवी, सातवी, नववी, अकरावी
२०२८-२९: आठवी, दहावी, बारावी

भाषा धोरण असे असणार

इ. पहिली ते पाचवी – मराठी, इंग्रजी व हिंदी (तिसरी भाषा)
इतर माध्यमात – माध्यम भाषा + मराठी + इंग्रजी (तीन भाषा)
इ. सहावी ते दहावी – राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार

निर्णयातील ठळक मुद्दे

१. राज्यात २०२५-२६ पासून इयत्ता १ पासून नवीन अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने लागू केला जाणार असून २०२८-२९ पर्यंत सर्व इयत्तांमध्ये ही रचना पूर्ण अंमलात येईल.
२. पारंपरिक १०+२+३ ऐवजी नवीन ५+३+३+४ आकृतीबंध स्वीकारण्यात आला असून शिक्षण आता पायाभूत, पूर्वतयारी, पूर्वमाध्यमिक आणि माध्यमिक अशा चार टप्प्यांत विभागले गेले आहे.
३) एससीईआरटी व बालभारती नवीन अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, पूरक साहित्य व ‘सेतू अभ्यासक्रम’ तयार करतील, जे सर्व माध्यमात वेळेवर आणि शाळांपर्यंत पोहोचवले जातील.
४. राष्ट्रीय स्तरावरील एनसीईआरटी पाठ्यपुस्तकांचा वापर आवश्यक सुधारणा करून केला जाणार असून, सर्व साहित्य अध्यापनक्षम व अभ्यासक्रम उद्दिष्टाशी सुसंगत असेल.
५. इयत्ता पहिली ते पाचवी मध्ये हिंदी तिसरी भाषा म्हणून शिकवली जाईल; इतर माध्यमांमध्ये मराठी, इंग्रजी व माध्यमभाषा या तीन भाषा अनिवार्य असतील; इ. सहावी ते दहावीसाठी भाषा धोरण अभ्यासक्रमानुसार ठरेल.
६. नवीन अभ्यासक्रम आनंददायक, अनुभवाधारित, तार्किक विचार वाढवणारा व ओझे कमी करणारा असेल; मूल्यमापनासाठी ‘Holistic Progress Card’ प्रणाली वापरली जाईल.
७. राज्यस्तरीय व विभागीय समित्या, शिक्षक प्रशिक्षण, शाळेचे वेळापत्रक, परीक्षा नियोजन आणि धोरण अंमलबजावणीसाठी आवश्यक यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या आहेत.
8.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *