
मुंबई :
बनावट पनीर किंवा चीज ॲनालॉग वापरणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कडक कारवाई करण्यात येत आहे. पनीरसारख्या बनावट पदार्थाची विक्री केल्याचे आढळून आल्यास अशा व्यावसायिकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.
पनीर हा खाद्यपदार्थामधील आवडता पदार्थ असून त्याला बाजारात मोठी मागणी असते. विशेषतः लहान मुलांमध्ये पनीरची क्रेझ अधिक आहे. मात्र काही ठिकाणी बनावट पनीर अथवा ‘चीज ॲनालॉग’ वापरून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणीत आढळून येते. अशा प्रकारे ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या पनीर विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६, तसेच २०११ आणि २०२२ मधील नियमानुसार ही कारवाई करण्यात येईल, असा इशारा झिरवाळ यांनी दिला.
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या कलम १८ (२)(ई) नुसार, ग्राहकांना अन्नपदार्थातील घटकांची माहिती देणे बंधनकारक आहे. तसेच, अन्न सुरक्षा व मानके (लेबलिंग आणि डिस्प्ले) नियमन २०२० च्या प्रकरण ३ मधील नियमन ९ (६) नुसार, अन्न व्यावसायिकांनी अन्नपदार्थांची विक्री करताना पोषण संबंधित माहिती आणि त्यातील घटकांची माहिती, तसेच आरोग्य संदेश प्रदर्शित करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अन्न सुरक्षा आणि मानके (लेबलिंग व डिस्प्ले नियमन) २०२० च्या नियमांनुसार, रेस्टॉरंट, हॉटेल, कॅटरर्स आणि फास्ट फूड विक्रेत्यांना आपल्या मेनू कार्ड्स, डिस्प्ले बोर्ड्स आणि ऑर्डर मशीनवर अचूक माहिती देणे अनिवार्य आहे. रेस्टॉरंट, हॉटेल व फास्ट फूड व्यावसायिकांकडून ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
परवाना रद्द करण्यात येणार
अन्न व औषध प्रशासन सर्व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील चीज ॲनालॉग वितरकांचे खरेदी-विक्री बिले तपासण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, किमान १० आस्थापनांची सखोल तपासणी करून अन्न नमुने घेऊन जप्तीची कारवाई करण्याचे आदेश झिरवाळ यांनी दिले आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट, फास्ट फूड विक्रेते आणि केटरर्स यांची खरेदी बिले तपासून, पनीरऐवजी चीज ॲनालॉगचा वापर करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६, नियम व नियमन २०११ तसेच अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यवसायिक परवाना व नोंदणी) नियमन २०११ मधील तरतुदींनुसार तात्काळ परवाना निलंबनाची कार्यवाही करण्याचे आदेश झिरवाळ यांनी दिले आहेत.
अन्न व्यवसायिकांच्या कार्यशाळा घ्या
विभागीय सह आयुक्त (अन्न) आणि सहा आयुक्त (अन्न) यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील हॉटेल असोसिएशनच्या कार्यशाळा घेऊन, पनीरच्या ऐवजी चीज ॲनालॉगचा वापर करत असल्यास, त्याबाबत मेनू कार्डमध्ये उल्लेख करण्याबाबत तसेच कायद्यातील तरतुदींबाबत अवगत करावे. यासोबतच, ग्राहकांमध्ये याबाबत जनजागृती करावी. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला माफ केले जाणार नसून अन्न व्यावसायिकांनी नियमांचे पालन करून ग्राहकांना अचूक माहिती देणे आवश्यक आहे.