
दररोज नियमितपणे हातांची स्वच्छता (Hand Wash) केली तर अनेक आजरांपासून दूर राहता येते. तसेही दिवसभरात आपण हात धुत असतोच. आज जागतिक हात स्वच्छता दिवस (Global Handwashing Day) आहे. हातांची स्वच्छता राखण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो. दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी हा दिवस साजरा केला जातो. विविध आजारांना प्रतिबंध करण्यासाठी हातांची स्वच्छता अतिशय महत्वाची आहे.
साबणाने नियमित पणे हात धुणे आवश्यक आहे. या गोष्टीची माहिती ग्लोबल हँड वॉश दिनी दिली जाते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते दिवसातून सहा ते दहा वेळा हात धुतले पाहिजेत. हात धुतल्यामुळे व्हायरस आणि बक्टेरियापासून दूर राहता येते. हात कशा पद्धतीने धुतले पाहिजेत? योग्य पद्धत कोणती? यामुळे कोणते फायदे होतात? याची माहिती घेऊ या..
साबण आणि पाण्याच्या मदतीने कमीत कमी वीस सेकंद हात धुतले पाहिजेत.
हात धुण्यासाठी नेहमी स्वच्छ पाण्याचा वापर करा.
सर्वात आधी हाताला साबण लावा नंतर हलक्या हाताने पाणी टाकून हात साफ करा.
हात धुताना दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर चांगले घासा
हाताच्या वरचा भाग, बोट, नखेही एकमेकांवर चांगल्या पद्धतीने घासून स्वच्छ करा.
नंतर पाण्याचा नळ सुरू करून हात स्वच्छ धुवून घ्या.
हात धुताना या गोष्टी लक्षात ठेवाच
साबण तुमच्या हातावरील तेल आणि बॅक्टेरिया स्वच्छ करण्यास मदत करतो. फक्त पाण्याने हात व्यवस्थित स्वच्छ होऊ शकत नाही. साबणाचा वापर केल्याने त्वचेवरील जंतू आणि बॅक्टेरिया काढून टाकण्यासाठी आवश्यक घर्षण निर्माण होते. त्यामुळे हात व्यवस्थित स्वच्छ होतात.
नळाखाली पटकन हात धुणे योग्य नाही. हात व्यवस्थित स्वच्छ होण्यासाठी कमीत कमी वीस सेकंद हात धुतले पाहिजेत.
हात ओले असतील तर अशा हातांवर बॅक्टेरिया आणि किटाणू फैलवण्याचा धोका जास्त असतो. हात धुतल्यानंतर जर हात व्यवस्थित कोरडे केले नाहीत तर हात धुण्याचा काहीच फायदा होत नाही. तेव्हा हात धुतल्यानंतर ते व्यवस्थित कोरडे करा.
हात धुतल्यानंतर लगेचच ज्या ठिकाणी कचरा किंवा धूळ असेल अशा वस्तूंना स्पर्श करू नका. पाण्याचा नळ बंद करण्यासाठी किंवा दरवाजा उघडण्यासाठी हाताच्या कोपराचा वापर करा.
बहुतांश लोक हात धुताना हाताच्या वरचा भाग, बोटे आणि नखांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात. हाताचा प्रत्येक भाग स्वच्छ करणे आवश्यक आहे.
हात धुताना गरम पाण्याच्या वापराने जास्त किटाणू नाहीसे होतील असा अनेकांचा समज आहे. परंतु यात काही तथ्य नाही. गरम पाण्यामुळे त्वचा कोरडी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे संक्रमणाच्या बाबतीत हात जास्त संवेदनशील होऊ शकतात.
बरेच लोक हात धुतल्यानंतर हात व्यवस्थित कोरडे करत नाहीत. तुम्ही देखील असेच करत असाल तर ही सवय आताच बदला. हात धुतल्यानंतर कापडाने हात चांगले कोरडे करा. जेणेकरून हातांवर बॅक्टेरिया चिकटण्याचा धोका राहत नाही.