
सातत्याने तुम्हाला सुद्धा थकवा जाणवतो का किंवा तुम्ही नेहमीच स्वतः ला तणावात पाहता का? (Heart Attack) तुमच्या हृदयाचे ठोके अनियमित राहतात का.. जर या प्रश्नांची उत्तरे हो अशी असतील तर तुम्ही सुद्धा हृदय विकाराच्या सूरुवातीच्या (World Heart Day 2024) लक्षणांचा सामना करत आहात. आज काल चाळीस पेक्षा जास्त वयाच्या अनेकांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हाय कोलेस्टेरोल यांसारख्या समस्या भेडसावत आहेत. या समस्यांमुळे हृदयविकाराचा धोका देखील वाढतो. जर तुम्हालाही ही लक्षणे जाणवत असतील तर तत्काळ डॉक्टरांना दाखवा.
जागतिक हृदय दिवस दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. हृदयाशी संबंधित आजरांबाबत जागरूकता वाढविण्याचाच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला. आजकालच्या धावपळीच्या बहुतेकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. तणाव वाढत चालला आहे. कामाचाही ताण वाढला आहे. आहराच्या वेळा पाळल्या जात नाहीत. फास्ट फूडचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या सगळ्या चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर झाला आहे. हृदय विकाराचे प्रमाण वाढले आहे. अन्य आजारांचाही विळखा घट्ट होत चालला आहे. आज जागतिक हृदय दिन आहे. या निमित्त काही चांगल्या सवयी अंगिकारण्याचा संकल्प करू या…
नियमितपणे व्यायाम, योग्य डाएट आणि स्ट्रेस मॅनेजमेंट यांसारख्या चांगल्या सवयींचा अंगिकार करून तुम्ही हृदयाला हेल्दी (Healthy Heart) ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या तज्ज्ञ नेमकं काय सांगतात ..
हेल्दी डाएटला सुरुवात करा
चांगला डाएट हृदयाच्या विकारांशी लढण्याचा चांगला मार्ग आहे. एक संतुलित डाएट तुम्हाला कोलेस्टेरोल, हाय ब्लड प्रेशर आणि वाढत्या वजनाच्या समस्या कमी करण्यात उपयुक्त ठरतो. त्यामुळे रोजच्या आहारात पोषक तत्वांनी समृद्ध असणाऱ्या खाद्य पदार्थांना प्राधान्य द्या. हिरव्या पालेभाज्या, फळे, धान्य, डेअरी उत्पादने, मासे, शेंगदाणे यांसारख्या खाद्य पदार्थांचा आहारात समावेश करा. या खाद्य पदार्थांतून तुम्हाला आवश्यक व्हिटॅमिन, खनिज, फायबर मिळतात. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जितकी कॅलरी घेता तितकीच ती तुम्हाला बर्न करावी लागते. नियमित व्यायाम करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेऊ शकता. तसेच हृदयाला हेल्दी देखील ठेऊ शकता.
स्लीप क्वालिटीचे महत्त्व ओळखा
रात्रभर व्यवस्थित झोप घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला थकवा जाणवतो का, झोप व्यवस्थित झाली नाही असे वाटत राहते का, उदासीनपणा जाणवतो का ही लक्षणे जाणवत असतील तर तुमची झोप बाधित राहत आहे. तुमच्या झोपेची गुणवत्ता खाण्यापिण्याच्या सवयीसह तुमचा मुड, स्मरणशक्ती या गोष्टींनाही प्रभावित करत आहे हे विसरू नका. चांगल्या झोपेची कमतरता तुम्हाला नेहमीच हृदयरोगाच्या दाराशी उभे करते.
तणाव सर्वात मोठं संकट
तणावाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते आहे. आज डॉक्टरांकडे येणाऱ्या बहुतेक रुग्णांना तणावाची समस्या जाणवत आहे. या तणावामुळेच धूम्रपान करण्याची इच्छा प्रबळ होते. जास्त प्रमाणात खाणे आणि शारीरिक निष्क्रियतेलाही बळ मिळते. क्रॉनिक तणाव उच्च रक्तदाबाचे मोठे कारण ठरू शकतो. या सगळ्या गोष्टी हृदयरोग आणि हृदयाघाताला आमंत्रण देतात.
आकडे काय सांगतात..
चर्चित आरोग्य पत्रिका लँसेट मध्ये प्रकाशित झालेल्या ताज्या अहवालानुसार आगामी काळात होणाऱ्या मृत्यूंचे एक मोठे कारण हृदयरोग असेल. दक्षिण पूर्व आशिया खंडात जगाच्या एकूण लोकसंख्या पैकी एक चतुर्थांश लोकसंख्या राहते. या भागात हृदयाशी संबंधित आजारांनी दरवर्षी 39 लाख मृत्यू होतात. या भागातील प्रत्येक चार व्यक्तींपैकी एका जनाला रक्तदाबाचा त्रास आहे. तर दहा पैकी एका व्यक्तीला मधुमेहाचा त्रास आहे. येथील 15 टक्क्यांपेक्षा कमी लोक चांगले उपचार घेऊ शकत आहेत.
‘या’ गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा
हृदयरोग वाढण्याचे एक मुख्य कारण म्हणजे मधुमेह. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात असतानाही महधुमेह असेल तर जोखीम कायम राहते. त्यामुळे साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित ब्लड शुगर चेक करत राहा. जर कुटुंबात हृदयाशी संबंधित आजारांचा इतिहास असेल तुम्हाला अधिक सावधानता बाळगावी लागेल. सुरुवातीलाच तपासणी केली तर भविष्यात येणाऱ्या संकटांपासून वाचता येईल.
कोलेस्टेरोल जास्त असेल तर फक्त आहार आणि शारीरिक हालचालींनी फरक पडणार नाही. जास्त वेळ एकाच जागी बसून काम करावे लागत असेल तर याचा परिणाम तुमच्या शरीरावर नक्कीच होईल. दर आठवड्याला कमीत कमी 150 मिनिट मध्यम शारीरिक व्यायाम केला तरी रक्तदाब आणि कोलेस्टेरोलचा धोका कमी होतो. अल्कोहोल सेवन करत असाल तर रक्तदाब, स्ट्रोक आणि अन्य गंभीर आजारांचा धोका कायम राहतो.
हृदय दिनाचा इतिहास
जागतिक हृदय महासंघाने सन 2000 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेबरोबर जागतिक हृदय दिवस साजरा केला. हा दिवस सर्व प्रथम 24 सप्टेंबर 2000 या दिवशी साजरा करण्यात आला. सन 2011 पर्यंत हा दिवस सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या रविवारी साजरा केला जात होता. त्यानंतर 2012 मध्ये तारीख बदलून 29 सप्टेंबर करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी 29 सप्टेंबर याच दिवशी जागतिक हृदय दिन साजरा केला जात आहे.
जागतिक हृदय दिनाचे महत्त्व
हृदय विकारांबाबत लोकांना माहिती देणे. हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी काय करता येईल याची माहिती देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी सरकारच्या आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम राबवण्यात येतात. आरोग्य तपासणी शिबिरांचेही आयोजन केले जाते. हृदय विकाराने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे, लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा उद्देश यामागे आहे. हृदय विकाराने दरवर्षी जगभरात 18.6 मिलियन पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो. हे प्रमाण चिंताजनकच म्हणावं लागेल.