
मुंबई :
एप्रिल १९६५ मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी प्रथमच रुईया महाविद्यालयात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी केली. जी भारताच्या प्रगतीचा आत्मा, संस्कृती आणि शाश्वततेची दिशा देणारी होती. त्याच ऐतिहासिक स्थळी, त्याच दिवशी, साठ वर्षांनी, २२ ते २५ एप्रिल २०२५ दरम्यान ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सव’ साजरा होणार आहे, अशी माहिती कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमाचे उदघाटन मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते होणार असून,तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन जी, केंद्रीय मंत्री मा. पियुष गोयल जी यांच्यासह कृष्ण गोपाल जी, मनमोहन वैद्य जी, सुनील आंबेकर जी, बि. एल संतोष जी आणि सुरेश सोनी जी यांसारखे ज्येष्ठ वक्ते लाभणार आहेत.
“पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी भारतीय राजकारणात एक अद्वितीय वैचारिक प्रवाह आणला. ‘एकात्म मानव दर्शन’, ‘अंत्योदय’ या सारख्या संकल्पना मांडून त्यांनी समाजातील शेवटच्या घटकाचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न केला. आज पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी, गृहमंत्री माननीय श्री अमित शाहजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी या सर्वांच्या कार्यात एकात्म मानवदर्शनचा प्रभाव स्पष्ट जाणवतो. आज देशपातळीवर आणि महाराष्ट्रात राबवल्या जाणाऱ्या सर्वच योजनांमधून पंडित दीनदयाळजींची मूल्ये झळकतात. अन्न, वस्त्र, निवारा या गरजांची पूर्तता, शिक्षण, नागरिकांचे संरक्षण या सर्वच गोष्टी आज समाजातील शेवटच्या व्यक्तीला मिळाव्यात यासाठी आमचे सरकार कार्यरत आहे. पंडितजींच्या विचारांनी केवळ तात्त्विक भूमिका मांडल्या नाहीत, तर सामान्य माणसाच्या उन्नतीसाठी कृतीचा मार्ग दाखवला. आज त्या विचारांची नव्याने उजळणी करताना, आपल्या कृतीत त्याचे प्रतिबिंब उमटले पाहिजे हाच सदर महोत्सव करण्याचा आमचा उद्देश आहे, असे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
या महोत्सवात भू सांस्कृतिक राष्ट्रवाद, भारत का स्व, लोकमत परिष्कार, भारताची विकासाची व्याख्या, पंडित दीनदयाळजींचे आर्थिक चिंतन या सारखे विषय श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहेत. पंडितजींचे विचार जास्तीस्त जास्त लोकांनी ऐकण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन यावेळी कॅबिनेट मंत्री प्रभात लोढा यांनी केले. सदर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ekatmamanavdarshan.org या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे. महोत्सवाचे आयोजन पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सव समितीच्या माध्यमातून होणार असून, सहयोगी संस्था म्हणून लोढा फाउंडेशन आणि दीनदयाल शोध संस्थान कार्यरत आहेत.
पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सव समितीच्या अध्यक्षस्थानी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा असून, त्यांनीच या महोत्सवाला राज्यव्यापी स्वरूप देण्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव केवळ स्मरणरूपात न ठेवता, पंडितजींच्या विचारांवर आधारित समाज हिताचे उपक्रम राज्यभर राबवले जात आहेत.