
मुंबई :
सीईटी कक्षाकडून अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या पीसीएम गटाच्या परीक्षेला शनिवारपासून सुरूवात झाली. मात्र परीक्षेच्या दुसऱ्या दिवशीच कुर्ला येथील परीक्षा केंद्रावर अचानक वीज गेल्याने व ती सुरळीत करण्यास दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आली. मात्र दोन तास परीक्षा केंद्रावर बसलेल्या विद्यार्थ्यांना उकाड्याचा सामना करावा लागला. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आली. दरम्यान ही रद्द करण्यात आलेली परीक्षा बुधवारी पुन्हा घेण्यात येणार असल्याचे सीईटी कक्षाकडून सांगण्यात आले.
कुर्ला येथील आकार कम्युनिकेशन या परीक्षा केंद्रावर सकाळी ७ वाजता विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आले. मालाड, भांडुप, मुलुंड, मीरा राेड, भाईंदर या ठिकाणाहून ६९ विद्यार्थी या परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी आले होते. परीक्षा केंद्रावर ९ वाजता परीक्षा सुरू झाल्यानंतर काही वेळातच केंद्रावरील वीज अचानक गेली. विजेची समस्या दूर करण्यासाठी केंद्र चालकाला दोन तास लागले. जनरेटरची व्यवस्था केल्यानंतर विजेची समस्या दूर झाली. तोपर्यंत विद्यार्थी परीक्षा केंद्रावरच बसून होते. मात्र त्यानंतर इंटरनेटच्या समस्येमुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षा देता येत नव्हती. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले होते. अखेर आकार कम्युनिकेशन या केंद्रावरील सकाळच्या सत्रातील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) घेण्यात आला. या सर्व गोंधळामध्ये परीक्षा केंद्रावर विद्यार्थी सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत बसून होते.
दुपारी २ वाजता विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामधून बाहेर सोडण्यात आले. मात्र केंद्रावर नसलेली वीज आणि खराब व्यवस्था यामुळे विद्यार्थ्यांना उकाड्याचा सामना करावा लागला. परीक्षा केंद्रावरील व्यवस्था चांगली नसल्याबाबत विद्यार्थी व पालकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान बुधवारी होणारी परीक्षा या केंद्रावर घेण्यात येऊ नये, अन्य केंद्रावर घेण्यात यावी, अशी मागणी पालक व विद्यार्थांकडून करण्यात येत आहे.
बुधवारी पुन्हा परीक्षा होणार परीक्षा
कुर्ला येथील आकार कम्युनिकेशन या परीक्षा केंद्रावर सकाळी अचानक विजेची समस्या निर्माण झाली. त्यामुळे एमएचटी सीईटीच्या पीसीएम गटातील सकाळच्या सत्रातील परीक्षा रद्द करण्यात आली. मात्र दुपारच्या सत्रामध्ये परीक्षा सुरळीत पार पडली. दरम्यान परीक्षा रद्द करण्यात आलेल्या ६२ विद्यार्थ्यांची बुधवारी पुन्हा परीक्षा घेण्यात येणार असून, त्यांना सोमवारपर्यंतच्या त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडी किंवा मोबाईल क्रमांकावर प्रवेशपत्रासंदर्भातील माहिती पाठविण्यात येईल, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितले.