
मुंबई :
भारतामध्ये मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मधुमेह हा भारतातील सर्वात मोठा आजार समजला जातो. मधुमेहासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणारे एम्पाग्लिफ्लोजिन हे औषध पेटंटमुक्त झाल्याने अनेक भारतीय औषध निर्मात्यांनी या औषधाचे जेनेरिक स्वरुप बाजारात आणले आहे. या जेनेरिक स्वरुपाची किंमत मूळ किमतीच्या ९० टक्के इतक्या कमी आहे. यामुळे देशातील ११ कोटींहून अधिक मधुमेही रुग्णांना आजारावरील औषधे परवडणाऱ्या दरात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
इंटरनॅशनल मेटाबॉलिक फिजिशियन असोसिएशनचे (इम्पा) नुकतेच मुंबईमध्ये दुसरे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात देशातील तज्ज्ञांनी मधुमेह आणि लठ्ठपण या दुहेरी आव्हानाला तोंड देण्यासाठी परस्परसंवाद आणि एकात्मिक उपाय योजनांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. जेनेरिक एम्पाग्लिफ्लोजिनची उपलब्धता ही केवळ मधुमेहासाठीच नव्हेतर हृदयासंदर्भातील आजारांवरही वापरण्यात येत असल्याने रुग्णांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. यामुळे रुग्णांचा आर्थिक भार कमी होईल आणि उपचारांशी सातत्य ठेवणे सुलभ होईल, असे इम्पाचे अध्यक्ष डॉ. नितीन पाटणकर यांनी सांगितले. यांनी सांगितले. मधुमेह आणि लठ्ठपणा यांसारख्या वाढत्या आजारांचा सामना करऱ्यासाठी संशोधन, सहकार्य आणि धोरणात्मक कृतीद्वारे दर्जेदार आणि परवडणारे उपचार सर्वांसाठी सुलभ करण्यासाठी इम्पा कार्यरत असल्याचे डॉ. पाटणकर यांनी सांगितले.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी देण्यात येणारे सेमाग्लुटाईड हे औषध २०२६ मध्ये पेटंटमुक्त झाल्यास त्याचे जेनेरिक औषध बाजारात उपलब्ध होऊन नागरिकांना लठ्ठपणावरील औषध स्वस्तात उपब्ध होण्यास मदत होणार आहे. यामुळे लठ्ठपणाचा सामना करणाऱ्या देशातील जवळपास १८ कोटींहून अधिक नागरिकांना याचा फायदा होणार आहे. लठ्ठपणावर उपलब्ध असलेल्या औषधांपैकी महत्त्वाचे औषध असलेले सेमाग्लुटाईड हे २०२६ मध्ये पेंटटमुक्त होण्याची शक्यता आहे. हे औषध पेंटटमुक्त झाल्यास त्याचे जेनेरिक औषध बाजारात येण्याचा मार्ग मोकळा होईल. यामुळे देशामध्ये लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करत असलेल्या रुग्णांना दर्जेदार उपचार उपलब्ध होतील. मात्र मागणी वाढते, तेव्हा गैरप्रकारालाही चालना मिळते, त्यामुळे सतर्कता आवश्यक असल्याने नैतिक औषध मार्गदर्शनाची जबाबदारीही वाढणार असल्याचे इम्पाचे सरचिटणीस डॉ. केतन पखाले यांनी सांगितले. पुढील वर्षामध्ये सेमाग्लुटाईड पेटंटमुक्त झाल्यास त्याचे जेनेरिक स्वरूपही बाजारात येऊन लठ्ठपणाशी झुंजणाऱ्या १८ कोटींहून अधिक नागरिकांना याचा लाभ होण्याची शक्यता आहे. मेटाबॉलिक विकारांवरील लढ्यात हा एक निर्णायक क्षण ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले.