
मुंबई :
वापरलेले सॅनिटरी पॅड, डायपर, कालबाह्य औषधी आदी नागरिकांच्या वैयक्तिक वापराशी संबंधित असलेल्या घरगुती स्वच्छताविषयक बाबींच्या संकलनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने ‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन’ (डोमेस्टीक सॅनिटरी अँड स्पेशल केअर वेस्ट कलेक्शन) सेवा कार्यान्वित केली जाणार आहे. मुंबईतील विविध गृहनिर्माण संस्था, निवासी संकुल, श्रृंगार केंद्र (ब्यूटी पार्लर), महिला वसतिगृह, शैक्षणिक संस्था आदी आस्थापनांना या सेवेचा लाभ घेता येईल. यासाठी संबंधित आस्थापनांना रितसर नोंदणी करावी लागेल. नोंदणीची प्रक्रिया २२ एप्रिल २०२५ पासून कार्यान्वित करण्यात आली आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.
हेही वाचा : Coconut Water:सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यायल्याने काय होते, चला जाणून घेऊ या…
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात आणि उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली मुंबईतील घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच, निरनिराळे उपक्रमही राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या वैयक्तिक वापराशी संबंधित कचरा संकलनाच्या उद्देशाने ‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन’ (डोमेस्टीक सॅनिटरी अँड स्पेशल केअर वेस्ट कलेक्शन) सेवा सुरू करण्यात येणार आहे.
या उपक्रमाबाबत उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी सांगितले की, मुंबईमध्ये सध्या रोज सुमारे ७ ते ८ हजार टन घनकचरा निर्माण होतो. यापैकी ७० ते ८० टन कचरा हा वैयक्तिक स्वच्छतेशी संबंधित (Sanitary Waste) असतो. त्यामध्ये प्रामुख्याने वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स, टॅम्पॉन्स, निरोध आणि इतर स्वच्छतासंबंधित बाबींचा तसेच शरीर पुसण्यासाठी वापरलेले विविध द्रवांनी दूषित कापूस, बँडेजेस (जसे की लघवी, रक्त, लाळ, पू, विष्ठा, नखांनी दूषित झालेले), कालबाह्य औषधी (इंजेक्शन, सुई, रेझर ब्लेड्स) आणि श्रृंगार केंद्रामध्ये (ब्यूटी पार्लर) निर्माण होणारा कचरा (वॅक्सिंग स्ट्रिप्स, पीपीई) आदींचा समावेश असतो. हा अत्यंत घातक प्रकारचा कचरा असला तरी बरेचदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि सामान्य घरगुती कचऱ्यामध्येच ते टाकले जाते. त्यामुळे, कचरा संकलित करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी क्लिष्टता निर्माण होते.
हेही वाचा : मुंबईत वायू प्रदूषण करणाऱ्यांवर तुरळक कारवाई; सहा महिन्यात MPCB कडून मोजक्याच नोटिसा
याच अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ‘घरगुती सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन’ (डोमेस्टीक सॅनिटरी अँड स्पेशल केअर वेस्ट कलेक्शन) सेवा सुरू करण्यात येणार आहे. ही सेवा १ मे २०२५ पासून प्रत्यक्षात सुरू होईल. तथापि, नागरिकांमध्ये यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी तसेच त्यांचा सहभाग सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेच्या वतीने २२ एप्रिल २०२५ पासून नोंदणी प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली आहे. गृहनिर्माण संस्था, निवासी संकुले, श्रृंगार केंद्र (ब्यूटी पार्लर), महिला वसतिगृहे व शैक्षणिक संस्था आदी आस्थापनांना या सेवेचा लाभ घेता येईल. सेवेचा लाभ घेण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc6zR8XHoOzXRNanCCdj4oKtS27Iu7vuaXBANiCGoKCfUCn5g/viewform या लिंकवर जाऊन नोंदणी करावी लागेल. तथापि, मुंबईतील नोंदणीकृत आस्थापनांना व्हॉट्सॲप तसेच अन्य माध्यमातून क्यूआर कोड पाठविण्यात येत आहे. सदर, क्यूआर कोड स्कॅन करुनही नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
स्वच्छताविषयक विशेष काळजीयोग्य कचऱ्यांचे संकलन करण्यासाठी पिवळ्या रंगाच्या पिशव्यांचा वापर केला जाणार आहे. सेवेसाठी नोंदणी केलेल्या आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष जाऊन सदर कचऱ्याच्या विलगीकरणाबाबत जनजागृतीही केली जाईल, अशी माहितीही दिघावकर यांनी दिली आहे.