
मुंबई :
पोटातून गाठ (Tumor) काढल्यानंतर १० वर्षांनी पुन्हा पोटात दुखू लागल्याने केलेल्या तपासणीमध्ये पोटामध्ये २१ x १२ सेमीची गाठ असल्याचे उघडकीस आले. मात्र खासगी रुग्णालयात उपचार करणे परवडणारे नसल्याने ही ३० वर्षीय महिला कामा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झाली. यावेळी केलेल्या शस्त्रक्रियेतून या महिलेच्या पोटातून तब्बल चार किलो वजनाची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश आले. या शस्त्रक्रियेनंतर या महिलेची त्रासातून सुटका झाली आहे.
कल्याण येथे राहत असलेल्या ३० वर्षीय महिलेच्या पोटात २०१६ मध्ये अचानक पोटात दुखू लागले. पोटात वारंवार दुखत असल्याने तिने नालासोपार येथील एका खासगी दवाखान्यात डॉक्टरला दाखविले. डॉक्टरांनी तिला मारू या खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. तिथे तिची सोनोग्राफी करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी तिला चर्नी रोड येथील सुश्रुषा रुग्णालयामध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठवले. यावेळी तेथील डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करून पोटातील गाठ काढली. त्यानंतर तिच्या पोटातील दुखणे बंद झाले होते. मात्र मार्च २०२५ मध्ये या महिलेला पोट फुगण्याबराेबरच पोटात दुखण्याचा त्रास पुन्हा होऊ लागला. त्यामुळे ती कल्याण येथील खासगी डॉक्टरकडे उपचारासाठी गेली.
डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. सोनोग्राफीच्या अहवालामध्ये तिच्या पोटात पुन्हा गाठ झाली असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या महिलेने कामा रुग्णालयामध्ये उपचारासाठी जाण्याचा निर्णय घेतला. ८ एप्रिल रोजी ही महिला कामा रुग्णालयामध्ये उपचारासाठी आली. यावेळी तिच्या विविध तपासण्या करण्यात आली. यावेळी या महिलेचे सीटी स्कॅन करण्यात आले. सीटी स्कॅनमध्ये महिलेच्या गर्भाशयामध्ये २१ x १२ सेमीची गाठ असल्याचे निदर्शनास आले. ही गाठ उजव्या बाजूच्या गर्भाशयातून पोटात नाभीच्या वरपर्यंत गेली असल्याचे सीटी स्कॅनमध्ये स्पष्ट झाले.
सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यायल्याने काय होते, चला जाणून घेऊ या…
या गाठीमुळे उजव्या बाजूच्या अंडाशयावर काही जखमा झाल्याचे आढळून आले. या तपासण्या झाल्यानंतर १५ एप्रिल रोजी ती कामा रुग्णालयात दाखल झाली. त्यानंतर २१ एप्रिल रोजी तिच्यावर लॅप्रोस्कोपी पद्धतीने शस्त्रक्रिया करून तिच्या उजव्या गर्भाशयातून गाठ काढण्यात आली. गर्भाशयातून काढण्यात आलेल्या या गाठीचे वजन वजन चार किलो इतके होते. शस्त्रक्रियेनंतर महिलेला एक दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते.
सध्या तिची प्रकृती उत्तम असून, तिला सामान्य कक्षात हलविण्यात आले आहे. तसेच गर्भाशयातून काढलेली गाठ ही कर्करोगाची आहे का याची तपासणी केली. मात्र ही गाठ कर्करोगाची नसल्याचा निष्पन्न झाल्याचे कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.