
मुंबई :
विविध खेळामध्ये जखमी होणारे खेळाडू हे उपचारासाठी खासगी रुग्णालयांना प्राधान्य देतात. या रुग्णालयांमध्ये क्रीडा दुखापतींसाठी स्वतंत्र विभाग असते. मात्र आता (KEM) केईएम रुग्णालयामध्येही क्रीडा दुखापतींसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार आहे. १५,००० चौरस फूट जागेवर उभारण्यात येणाऱ्या या विभागाचे २१ एप्रिल रोजी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते या केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले.
जखमी होणाऱ्या खेळाडूंवर उपचार करण्यासाठी देशामध्ये सहा रुग्णालयांमध्येच सुविधा उपलब्ध आहे. या रुग्णालयांमधील क्रीडा दुखापतींवर केंद्र हे अद्ययावत व आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असल्याने खेळाडू या रुग्णालयांमध्ये उपचार करण्याला प्राधान्य देतात. मात्र आता केईएम रुग्णालयामध्ये खेळाडूंच्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी क्रीडा दुखापती केंद्र, पुनर्वसन व संशोधन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केईएम रुग्णालयातील नवीन इमारतीच्या १२ व्या मजल्यावर १५ हजार चौरस फूट जागेवर हे केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये एकाच छताखाली प्रगत वैद्यकीय सेवा, संशोधन आणि पुनर्वसन सेवा पुरविण्यात येणार आहे.
या क्रीडा दुखापत केंद्रासाठी सुमारे २० कोटी रुपये खर्च येणार असून, हे केंद्र टर्नकी पद्धतीने उभारण्यात येणार आहे. केईएम रुग्णालयामध्ये क्रीडा संबंधित दुखापतींसाठी येणाऱ्या सर्व तरुण रुग्णांना अत्याधुनिक सुविधा आणि प्रगत उपकरणांसह उपचार मिळणार आहेत. हे केंद्र भारतातील क्रीडा दुखापतींवरील उपचार, पुनर्वसन आणि संशोधनातील उत्कृष्टतेच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते या क्रीडा दुखापत, पुनर्वसन व संशोधन केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि उपायुक्त शरद उगडे, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन देसाई, क्रीडा दुखापती तज्ज्ञ आणि वरिष्ठ आर्थ्रोस्कोपी सर्जन डॉ. रोशन वाडे, डॉ. अतुल पानघाटे, डॉ. संदीप सोनोने, डॉ. सुनील भोसले, डॉ. प्रदीप नेमाडे आणि रुग्णालयातील अन्य डॉक्टर व प्राध्यापक उपस्थित होते.
कामा रुग्णालयात महिलेच्या गर्भाशयातून काढली चार किलो वजनाची गाठ
पश्चिम भारतातील एकमेव केंद्र ठरणार
क्रीडा दुखापतींसाठी केईएम रुग्णालयात सुरू करण्यात येणारे क्रीडा दुखापती, पुनर्वसन व संशोधन केंद्र हे पश्चिम भारतातील खेळाडूंच्या दुखापतीवर उपचार करणारे एकमेव केंद्र ठरणार आहे. यामुळे केईएम रुग्णालय हे देशातील क्रीडा दुखापती आणि पुनर्वसनासाठी समर्पित असलेल्या सहा उच्चभ्रू केंद्रांपैकी एक होणार आहे.
बालकृष्ण इंडस्ट्रीजच्या माध्यमातून उभारणार केंद्र
क्रीडा खेळाडूंना अद्ययावत उपचार मिळावेत यासाठी केईएम रुग्णालयात उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक केंद्राची स्थापना बालकृष्ण इंडस्ट्रीज (बीकेटी) यांच्या सहकार्याने करण्यात येत आहे. बालकृष्ण इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष अरविंद पोद्दार आणि विजयालक्ष्मी पोद्दार यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.