मुख्य बातम्याशहर

BMC:मुंबईत प्रथमच साकारणार टाऊनहॉल इमारत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयासह संपूर्ण पुरातन वारसा परिसर न्याहाळण्याची पर्यंटकांसह सर्वांना मिळणार संधी

मुंबई :

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्यालय यांचा परिसर हा देश-विदेशातून मुंबईत येणाऱया पर्यटकांच्या सर्वाधिक आकर्षणाचा भाग असतो. पुरातन वारसा स्थळ असलेला हा परिसर आणखी दिमाखदार होणार आहे. महानगरपालिका मुख्यालय इमारतीसमोर असलेल्या महानगरपालिका क्रीडाभवन जागेचा पुनर्विकास करुन याठिकाणी विविध वै॑शिष्ट्यांनी नटलेली ‘टाऊनहॉल जिमखाना’ वास्तू उभारण्यात येणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय व सभोवतालचा संपूर्ण परिसर हा मुंबई शहरातील सर्वाधिक महत्वाच्या वारसाजतन प्रसीमा (हेरिटेज प्रीसींक्ट) मध्ये समाविष्ट आहे. पुरातन वारसा, वास्तूशिल्प व सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असणाऱया या परिसरात आझाद मैदानासारखे ऐतिहासिक प्रमुख क्रीडांगण आहे. तसेच मेट्रो ३ सेवेच्या रुपाने महत्त्वाचे स्थानक देखील या भौगोलिकतेमध्ये आता जोडले गेले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय या वास्तू न्याहाळण्यासाठी काही वर्षांपूर्वी महानगरपालिकेने मुख्यालयासमोर सेल्फी पॉइंट देखील उभारला. असे असले तरी या पुरातन वारसा असलेल्या इमारती व संपूर्ण परिसर जवळून तसेच विहंगम स्वरुपात न्याहाळण्यासाठी अतिरिक्त सुविधा नव्हती. ही कमतरता महानगरपालिकेने ‘टाऊनहॉल जिमखाना’ वास्तू रुपाने भरुन काढण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या संकल्पनेनुसार व निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीसमोर असलेल्या महानगरपालिका क्रीडाभवन जागेचा पुनर्विकास करुन ही ‘टाऊनहॉल जिमखाना’ इमारत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याची निविदा प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे.

‘टाऊनहॉल जिमखाना’ वास्तू साकारण्यामागे प्रामुख्याने मुंबईकरांना तसेच पर्यटकांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांकरीता शासकीय पुढाकारातून मुंबईत प्रथमच टाऊनहॉल अर्थात नगर सभागृह साकारणार आहे. परिणामी मुंबईकरांना नागरी संवादासाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. त्यासमवेत या परिसरात मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांचादेखील विचार करण्यात आला आहे. पर्यटकांसह सर्वांना हा पुरातन वारसा परिसर विहंगम स्वरुपात न्याहाळता येणार आहे. त्यासाठी या इमारतीमध्ये काचेचा घुमट (ग्लास डोम), तसेच व्हिविंग गॅलरी असेल. या गॅलरीपर्यंत जाण्यासाठी काचेच्या कॅप्सूल लिफ्ट असतील. त्याचप्रमाणे छतावर उपाहारगृह अर्थात रूफटॉप कॅफटेरिया देखील नियोजित आहे.

ही संपूर्ण इमारत तळ मजला अधिक पाच मजल्यांची असेल. ही वास्तू साकारताना सभोवतालच्या उच्च दर्जाच्या पुरातन वारसा (हेरिटेज) वास्तू लक्षात घेता, टाउनहॉल इमारतीची उंची ही सभोवतालच्या पुरातन वारसा वास्तूंच्या उंचीइतकी समर्पक प्रस्तावित करण्यात आली आहे, जेणेकरून या पुरातन वारसा इमारतींच्या सौंदर्य व प्रमाण यांस कोणतीही बाधा पोहचणार नाही. तसेच सभोवतालच्या परिसराची दृश्यमानता देखील अबाधित राहील, अशी काळजी घेण्यात येणार आहे. इमारतीची एकंदरीत रचना व बाह्य सजावट ही सभोवतालच्या वारसा जतन प्रसीमेला साजेशी करण्यात येणार आहे.

इमारतीच्या आतमध्ये नगर सभागृह असेल. तसेच अत्याधुनिक उपहारगृह देखील प्रस्तावित आहे. पर्यटकांना काचेच्या कॅप्सूल लिफ्टमधून इमारतीच्या छतावर मध्यभागी असणाऱया व्हिविंग गॅलरीमध्ये जाण्याची सोय असेल. या गॅलरीमुळे पर्यटकांना आसपासच्या पुरातन वारसा इमारतींचे जवळून व अधिक चांगल्या रितीने अवलोकन करणे शक्य होणार आहे.

इमारतीच्या छतावर काचेपासून घडवलेल्या घुमटाची (ग्लास डोम) रचना देखील करण्यात येणार आहे. हा घुमट सभोवतालच्या पुरातन वारशाला साजेसा असेल. या घुमटातून देखील पर्यटकांना सभोवतालच्या पुरातन वास्तूंचे सौंदर्य न्याहाळण्याची संधी मिळेल. टाऊनहॉल इमारतीमध्ये दोन तळघरांमध्ये जवळपास ६० वाहनांकरिता वाहनतळाची सुविधा असेल. परिणामी, या परिसरातील वाहनतळाची समस्या काहीशी सुटेल. या टाऊनहॉल जिमखाना वास्तूची संकल्पना महानगरपालिका वास्तुशास्त्रज्ञ विभागाने तयार केली आहे.

या इमारतीच्या बांधकामाकरीता उपअभियंता (इमारत बांधकाम) (शहर) विभागामार्फत निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या इमारत उभारणीचे काम लवकरच सुरु होईल. एकूणच, ही टाऊनहॉल इमारत मुंबईकरांसह देश-विदेशातून येणाऱया पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरणार आहे. एवढेच नव्हे तर, या वास्तुच्या रुपाने एका वैशिष्ट्यपूर्ण इमारतीची मुंबईच्या प्रसिद्ध स्थळांच्या यादीमध्ये भर पडणार आहे.

पहलगाम दुर्घटनेतील महाराष्ट्रातील चार पार्थिव मुंबईकडे रवाना

सुसज्ज व अत्याधुनिक असे महानगरपालिका क्रीडाभवन उभारणार
दरम्यान, काही दिवसांपूर्वी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सध्याच्या महानगरपालिका क्रीडाभवन इमारतीला भेट देवून पाहणी केली होती. इमारतीमधील खेळाच्या सुविधा अपुऱ्या स्वरूपाच्या असून सध्याची वास्तू वापराविना आहे. तसेच इमारतीची सातत्याने दुरुस्ती करावी लागते.

एवढेच नव्हे तर या परिसरात येवून क्रीडाभवन, जिमखान्याच्या सुविधांचा लाभ घेणे महानगरपालिका कर्मचाऱयांना सहज शक्य होत नाही, इत्यादी बाबी महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांच्या निदर्शनास आल्या होत्या. त्यावेळी, सद्यस्थितीतील महानगरपालिका क्रीडाभवन जागेचा पुनर्विकास करुन टाऊनहॉल जिमखाना उभारताना महानगरपालिका कर्मचाऱयांसाठी हक्काचे असे क्रीडाभवन देखील वाढीव, सुसज्ज व अत्याधुनिक रुपाने साकारावे, या क्रीडाभवनाचा जास्तीत जास्त कर्मचाऱयांना लाभ घेता येईल, अशी जागा निवडून तेथे क्रीडाभवन उभारण्याच्या दृष्टिने प्रशासकीय कार्यवाहीला गती द्यावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले.

त्यानुसार, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकरिता वाढीव, सुसज्ज व अत्याधुनिक क्रीडा सुविधा असणारे क्रीडाभवन हे महालक्ष्मी रेसकोर्स जवळील तुळशीवाडी येथे बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. ही जागा शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच रेसकोर्स सारख्या निसर्गरम्य, मोकळ्या परिसरात आहे. तेथे येण्यासाठी उपनगरीय रेल्वे, मुंबई किनारी रस्ता यांचीही सुविधा आहे. परिणामी महानगरपालिकेच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना तेथे येवून सुविधांचा लाभ घेता येईल. याठिकाणी नियोजित क्रीडा सुविधांमध्ये बॅडमिंटन कोर्ट्, टेबल टेनिस, अत्याधुनिक व्यायाम शाळा तसेच जलतरण तलाव आदी सुविधांचा समावेश असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *