शिक्षण

School:राज्यभरातील ३१ हजार ११ शाळा ‘जिओ टॅगिंग’पासून दूर

जीआयएस मोबाईल अ‍ॅप मधून शाळांची माहिती अपलोड

मुंबई
राज्यभरात असलेल्या १ लाख ०८ हजार ३०१ शाळांपैकी (School) केवळ ७७ हजार २९० शाळांचे आतापर्यंत ‘जिओ टॅगिंग’ करण्यात आले असून ३१ हजार ११ शाळांनी अद्याप नोंदणी केलेली नाही. पुणे जिल्ह्यातील ५ हजार ५२६ शाळांची सर्वाधिक नोंद झाली आहे. या पाठोपाठ नाशिक ३ हजार ८३९ , सोलापूर ३ हजार ९८८ आणि ठाणे जिल्ह्यातून ३ हजार ५८६ शाळांनी नोंदणी केली आहे.

प्राथमिक शिक्षणाची संस्कार केंद्र असणार्‍या अंगणवाड्या, शाळा यांच्या कामकाजात एकसूत्रीपणा आणण्यासाठी राज्यातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्रांचे छायाचित्रांसह ‘जिओ टॅगिंग’ करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार आता महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटर या संस्थेने शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रांसह टॅग करून भौगोलिक तंत्रज्ञानाद्वारे सर्व माहिती एकत्रित करण्यासाठी महास्कूल जीआयएस मोबाईल अ‍ॅप विकसित केले आहे. यामाध्यमातून सध्या नोंदणी सुरु आहे.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७ हजार ३६६ शाळा आहेत. त्यापैकी ५ हजार ५२६ शाळांचे मॅपिंग झाले असून, १ हजार ८४० शाळा अजून नोंदविल्या गेलेल्या नाहीत. त्याखालोखाल नाशिक जिल्ह्यात १ हजार ७४७, नागपूरमध्ये १ हजार ३५५, कोल्हापुरात १ हजार ३३८ आणि नंदुरबारमध्ये १ हजार २४७ शाळा मॅप न झालेल्या आहेत. तर सिंधुदुर्ग (२११), भंडारा (२८०), वाशिम (४६०) आणि हिंगोली (४०६) या जिल्ह्यांमध्ये नोंद न झालेल्या शाळांची संख्या तुलनेने कमी आहे. ठाणे, सोलापूर, सातारा, संगली आणि औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) या जिल्ह्यांमध्येही शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, त्यातील अनेक शाळांचे मॅपिंग झालेले आहे.

या अ‍ॅपमध्ये शाळांना त्यांचा यूडायस कोड किंवा यूडायस प्लसमधील संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक यांनी नोंदविलेला मोबाईल क्रमांक टाकून लॉगिन करायचे आहे. त्यानंतर शाळेची यूडायस प्लसमध्ये भरलेली माहिती या अ‍ॅपमध्ये दिसणार आहे. त्यानंतर शाळेचे जीआयएस लोकेशन घेऊन शाळेचे नाव, शाळेची संपूर्ण इमारत, किचन शेड, मुलांचे व मुलींचे स्वच्छतागृह सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा असे एकूण पाच फोटो समाविष्ट करून संबंधित शाळेने माहिती भरायची आहे.

ही माहिती भरताना संबंधित मुख्याध्यापक यांनी शाळेच्या आवारात उपस्थित राहून फोटो, माहिती अद्ययावत करण्याची खबरदारी घ्यावी. संबंधित माहिती अ‍ॅपवर ३० एप्रिलपूर्वी अद्ययावत करावी. सर्व शाळांकडून ही माहिती भरून घेण्यात येत असल्याची खातरजमा संबंधित शिक्षणाधिकारी यांनी करावी, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

विद्यापीठांच्या समकक्षतेसाठी आता ‘महासार्क’

 

▸ महाराष्ट्रातील १.०८ लाख शाळांपैकी ७७ हजार शाळांचेच मॅपिंग
▸ ३१ हजार ११ शाळांचे अद्याप मॅपिंग झालेले नाही
▸ पुणे, नाशिक, नागपूर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक शाळांचे जिओ टॅगिंग झाले
▸ सिंधुदुर्ग, भंडारा, वाशिममध्ये सर्वात कमी शाळांचे जिओ टॅगिंग झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *