
मुंबई :
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एप्रिल १९६५ मध्ये प्रथमच रुईया महाविद्यालय परिसरात ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ या विचारांची मांडणी केली. जी भारताच्या प्रगतीचा आत्मा, संस्कृती आणि शाश्वततेची दिशा देणारी होती. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने त्याच ऐतिहासिक स्थळी, त्याच दिवशी, ६० वर्षांनी २२ ते २५ एप्रिल २०२५ दरम्यान ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सव’ आयोजन करण्यात आले होते. आज या कार्यक्रमाच्या समारोपाला महाराष्ट्राचे आदरणीय राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन जी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल जी, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा जी, दीनदयाळ शोधसंस्थेचे अध्यक्ष श्री अतुल जैन जी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुरेश सोनी जी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये बोलताना राज्यपाल म्हणाले, “जेव्हा संपूर्ण जग कोविडशी झुंजत होते, त्यावेळी आपण प्रत्येक जण अतिशय आतुरतेने लस येण्याची वाट बघत होतो. जेव्हा लस तयार झाली, तेव्हा जगभरातील सर्वच मेडिकल कंपन्या त्या लसीचे पेटंट घेण्याच्या शर्यतीत लागल्या, जेणेकरून त्यातून पैसे कमावता येतील. पण त्या वेळी मोदीजींनी असे केले नाही. संपूर्ण भारताला आणि जगालाही मोदीजींनी लस पुरवली आणि आजही त्याची आठवण जग ठेवत आहे. मोदीजींना हा विचार कुठून आला, या बाबत चिंतन केल्यास त्याची मुळे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या शिकवणीत आढळतात. विकसित भारतासाठी आज प्रत्येक व्यक्तीची प्रगती होणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी पंडितजींची शिकवण अतिशय महत्त्वाची ठरते. आज तरुणांपर्यंत सुद्धा त्यांचे विचार पोहोचायला हवेत, जेणेकरून आपल्या भविष्यातील नेत्यांची तत्त्वे आणि मूल्ये पक्की असतील. आज याठिकाणी सांगताना अतिशय आनंद होत आहे की, रतन टाटा कौशल्य विद्यापीठात आम्ही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे विचार रुजवणार आहोत. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे मी अभिनंदन करतो की, त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमाचे आयोजन केले आणि पंडितजींच्या विचारांची ज्योत तेवत ठेवली.”
‘एकात्म मानवदर्शन’ आणि पंडितजींचे आर्थिक चिंतन याबाबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. ते म्हणाले, “लहानपणापासून एकात्म मानवदर्शनाचा विचार केवळ ऐकला नाही, तर तो जीवनात उतरवण्याचा नेहमीच प्रयत्न केला. पंडित दीनदयाळ उपाध्यायजींनी आज जगात काय घडणार हे दशकांपूर्वीच जाणले होते. भांडवलशाही, मार्क्सवाद यांसारख्या विचारधारा आल्या, पण माणसाच्या सर्वांगीण विकासाला दिशा देणारे तत्त्वज्ञान फक्त भारतातून, एकात्म मानवदर्शनाच्या रूपात पुढे आले. पंडितजींनी भारतीय संस्कृतीच्या मुळाशी जाऊन ‘अंत्योदय’चा विचार मांडला. समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विकास व्हावा, प्रत्येकाला काम मिळावे, आरोग्यसेवा मोफत मिळावी, ही भूमिका स्पष्ट होती. आज मोदींनी आयुष्मान भारतच्या माध्यमातून ६२ कोटींहून अधिक भारतीयांना मोफत विमा दिला; पक्की घरे, गॅस, रोजगार, अन्नधान्य यासाठीच्या सर्वच योजनांतून पंडितजींचा विचार कृतीत उतरवला. आज स्वप्न आहे ‘विकसित भारत’ घडवण्याचे आणि तेव्हाच शक्य होईल जेव्हा प्रत्येक व्यक्तीचा विकास होईल. गुलामीची मानसिकता झटकून आपल्या इतिहासाचे, आपल्या संस्कृतीचे पुनरुज्जीवन करावे लागेल. हाच पंडितजींचा खरा संदेश आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय आहे.”
प्रसंगी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, “आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली पंडित दीनदयाळ उपाध्यायजींचे विचार प्रत्यक्षात उतरत आहेत, याचा मला अभिमान आहे. मलबार हिल मतदारसंघाचा आमदार या नात्याने त्या परिसरातील सामान्य नागरिकांपर्यंत पंडितजींचे विचार पोहोचवावेत, या उद्देशाने कोस्टल रोडजवळ त्यांच्या नावाचा चौक निर्माण केला. त्याचप्रमाणे तेथे एकात्म मानवदर्शन आणि पंडितजींचा जीवनपट उलगडणारी प्रदर्शनी स्थापित केली. पंडितजींच्या पुण्यतिथीला, ११ फेब्रुवारी रोजी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या हस्ते सदर चौकाचे आणि प्रदर्शनाचे लोकार्पण झाले. त्याच वेळी एकात्म मानवदर्शनाचा हिरक महोत्सव साजरा करावा, ही संकल्पना माझ्या मनात आली आणि ती आज साकार झाली, याचा आनंद आहे. आदरणीय राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन जी यांना जेव्हा या कार्यक्रमाबद्दल समजले, तेव्हा त्यांनी असा प्रबोधनात्मक कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक कॉलेजमध्ये व्हायला हवा, याबाबत मी स्वतः सूचना देईन, असे सांगितले. त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.” या कार्यक्रमासाठी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हिरक महोत्सव समिती’ कार्यरत आहे. या समितीचा अध्यक्ष या नात्याने पंडितजींचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आम्ही नेहमीच करत राहू, असे मंगल प्रभात लोढा म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुरेश सोनी यांनी भारताच्या विकासाची संकल्पना काय आहे आणि आपल्या संस्कृतीशी तिचे मूळ कसे जोडले गेले आहे, याबाबत आपले मौलिक विचार मांडले. या चार दिवसांच्या महोत्सवात भू-सांस्कृतिक राष्ट्रवाद, भारत का ‘स्व’, लोकमत परिष्कार, भारताची विकासाची व्याख्या, पंडित दीनदयाळजींचे आर्थिक चिंतन या सारख्या विषयांवर श्रोत्यांना विचारमंथन ऐकायला मिळाले आणि आज या कार्यक्रमाची सांगता झाली.