
मुंबई :
मृतदेहांची सुरक्षित वाहतूक, त्यांचा सन्मान आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने जे.जे. रुग्णालयामध्ये (Hospital) दोन अत्याधुनिक इलेक्ट्रिक शववाहिन्या आणण्यात आल्या आहेत. या शववाहिन्यांचे जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांच्या हस्ते रुग्णालयाच्या मुख्य इमारतीत उद्घाटन करण्यात आले. ही वाहने अत्याधुनिक असून, स्वच्छ, कार्यक्षम आणि सन्मानाने मृतदेह वाहतूक करण्याची सुविधा देतात. रुग्णसेवेच्या बांधिलकीच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे आणि फॉरेन्सिक विभागप्रमुख डॉ. बी. जी. चिखलकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये अशा प्रकारची सेवा सुरू करणारे जे.जे. हे पहिले शासकीय रुग्णालय ठरले आहे.
मृतदेहांच्या वाहतुकीसाठी ही वाहने खास तयार करण्यात आली असून, यामध्ये सुरक्षा, कार्यक्षमता आणि सन्मान यांचा समतोल राखणारी अनेक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. यात आधुनिक हायड्रॉलिक प्रणाली व टिल्टिंग रोलर यंत्रणा बसवलेली आहे, ज्यामुळे मृतदेह स्ट्रेचरवर हलवणे अधिक सोपे होते आणि त्यासाठी कमी मनुष्यबळाची आवश्यकता भासते. त्यामुळे मृतदेहाची काळजीपूर्वक हाताळणी होते व कुटुंबीय किंवा रुग्णालय कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये याची खात्री कैली जाते.
या नव्या EV वाहनांची आणखी एक विशेष बाब म्हणजे त्यांची निगेटिव्ह प्रेशर प्रणाली ही यंत्रणा संक्रमण रोखण्यास मदत करते. त्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका टळतो व कर्मचारी आणि परिसर सुरक्षित राहतो. ही वाहने पूर्णतः पर्यावरण पूरक असून, त्यांचे कार्बन उत्सर्जन शून्य आहे. राज्य सरकारच्या हरित व शाश्वत आरोग्य सेवांच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे रुग्णालयाचा कार्बन फुटप्रिंट कमी होतो आणि मृतदेह वाहतूक प्रक्रियेतील गुणवत्ता वाढते.
मृत व्यक्तीला सन्मान देणे ही आपली जबाबदारी आहे आणि हा प्रवास कुटुंबीयांसाठी कमीत कमी त्रासदायक असावा, यासाठी ही वाहने डिझाइन करण्यात आली आहेत. ही वाहने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्यामुळे त्यासाठी कमी मनुष्यबळ लागते आणि त्यामुळे रुग्णालय कर्मचारी इतर महत्त्वाच्या कामांकडे अधिक लक्ष देऊ शकतात. आपत्कालीन सेवा अधिक कार्यक्षम होतात आणि सर्व व्यवस्थापनात सुधारणा होते. महाराष्ट्रातील पहिले शासकीय रुग्णालय म्हणून, जे. जे. रुग्णालय तंत्रज्ञानाच्या दृष्टीने पुढे आहेच, पण त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रात पर्यावरण पूरक सेवा देण्यामध्ये अग्रेसर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
२४ वर्षीय महिलेचे आणि ५५ वर्षीय पुरूष हृदयरोग रुग्णांचे प्राण अपोलोने वाचवले
ही सेवा मृतदेहांची हाताळणी अधिक सन्मानपूर्वक करते आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरण पूरकता यामुळे सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये एक नवा आदर्श निर्माण करणारी पायाभूत सुविधा ठरणार आहे.
– डॉ. अजय भंडारवार, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय