मुख्य बातम्याशहर

Empowerment:मुंबईत ‘नभ: स्पर्श’चे उद्घाटन : १५० भारतीय महिलांच्या कलाकृतींचा उत्सव

‘नभ:स्पर्श’द्वारे एनजीएमए या आवाजांना केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न करत आहे

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (NGMA), मिनिस्ट्री ऑफ कल्चर, भारत सरकार, यांच्या सहयोगाने (Empowerment) ‘नभ: स्पर्श – इंडियन वुमन प्रिंटमेकर्स’ या प्रदर्शनाचा मुंबईतील आवृत्तीचा उद्घाटन सोहळा २५ एप्रिल २०२५ रोजी पार पडला. या प्रदर्शनात देशभरातून आणि विविध पिढ्यांमधील १५० महिला कलाकारांच्या प्रिंटमेकिंग कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.

लिथोग्राफ, एचिंग, अ‍ॅक्वाटिंट, एन्ग्रेव्हिंग, स्क्रीन प्रिंट्स आदी तंत्रांचा समावेश असलेले हे प्रदर्शन, महिलांच्या प्रतिभेची विविधता आणि प्रिंटमेकिंगमधील त्यांच्या योगदानाचे व्यापक दर्शन घडवते. प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योजिका आणि जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता जिंदाल यांच्या हस्ते झाले. यावेळी (NGMA) एनजीएमएचे महासंचालक (Director General) डॉ. संजीव किशोर गौतम आणि एनजीएमएच्या संचालिका (Director) निधी चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या इतर मान्यवरांमध्ये लॉरेंट वेरगैन, फेरोझा गोदरेज, डॉ. सरयू दोषी, ब्रिंदा मिलर, श्रुती दास, असद लालजी, नैना कनोडिया, संजुक्ता अरुण, रुक्मिणी दहानुकर यांचा समावेश होता.

हे प्रदर्शन एनजीएमएच्या वतीने श्रुती दास – उपक्युरेटर (Deputy Curator) यांच्या सहकार्याने सादर करण्यात आले आहे. ‘नभ: स्पर्श’ भारतीय प्रिंटमेकिंगच्या प्रवासाची कथा महिला कलाकारांच्या दृष्टिकोनातून मांडते. कलात्मक दर्जा, नवकल्पना आणि व्यक्तिशक्ती यांची झलक देणारे हे प्रदर्शन प्रेक्षकांना या कलाकारांच्या वैयक्तिक अनुभवांच्या आणि सर्जनशील वाटचालीच्या जवळ घेऊन जाते.

एनजीएमएच्या संग्रहातून निवडलेल्या काही वरिष्ठ आणि प्रथितयश कलाकारांच्या कलाकृती या प्रदर्शनात समाविष्ट आहेत. यात अनुपम सूद, रिनी धूमल, ललिता लाजमी, नयना दलाल, जया अ‍ॅप्पासामी, शोभा बृता, कांचन चंदर, प्रतिभा डाकोजी, शोभा घारे, अनिता दास चक्रवर्ती, झरीना हाशमी आदींचा समावेश आहे.

प्रमुख आकर्षणांमध्ये अनुपम सूद यांची ‘मास्क सिरीज’, रिनी धूमल यांचे ‘देवी’, झरीना हाशमी यांच्या भूमितीय रचनांचा अभ्यास, कृष्णा देवयानी यांची अध्यात्मिक प्रेरणेतून साकारलेली मालिका, आणि ललिता लाजमी यांचे ‘माइंड्स कपबोर्ड्स’ या अंतर्मुख कलाकृतींचा समावेश आहे. या साऱ्यांतून स्त्रीत्वाचे विविध पैलू आणि प्रिंटमेकिंगचे गहिरे स्वरूप अनुभवायला मिळते.

या प्रदर्शनातील एक विशेष विभाग स्व. गोगी सरोज पाल यांना अर्पण करण्यात आला आहे. त्यांच्या काही दुर्लक्षित पण प्रभावी कलाकृती – विशेषतः एचिंग आणि लिथोग्राफ – यासोबत त्यांनी आपल्या मुलाला ‘पुन्ना’ याला लिहिलेली हाताने लिहिलेली पत्रेदेखील प्रदर्शित केली गेली आहेत. ही पत्रे त्यांनी दिल्लीतील गढी स्टुडिओमधील वास्तव्यात लिहिली होती. या कलाकृती आणि लेखनांमधून एक स्त्री कलाकार आणि आई म्हणून त्यांचा आंतरिक संघर्ष आणि सर्जनशीलता उलगडते. त्यांच्या विविध मन:स्थिती दर्शवणाऱ्या ३२ निवडक छायाचित्रांची सिरीजदेखील या विभागात पाहायला मिळते.

प्रदर्शनात मुलांसाठी एक खास कोपरा सजवला असून, रोजच्या आयुष्यातील सौंदर्य टिपणाऱ्या कलाकृती तिथे आहेत – मुलांना सहजपणे आणि आनंदात कला अनुभवता यावी, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीत निसर्गावर आधारित वास्तववादी चित्रांचादेखील समावेश आहे – प्राणी आणि मानवी व्यक्तीचित्रे यावर लक्ष केंद्रित करून सादर केलेली ही मालिका निसर्गाशी असलेल्या आपुलकीच्या नात्याची आठवण करून देते.

“प्रिंटमेकिंग ही भारतात फार प्राचीन आणि समृद्ध परंपरेची कला आहे. एक प्रिंटमेकर म्हणून, या माध्यमाच्या सर्जनशील सामर्थ्याने मी कायम भारावून जातो. प्रदर्शनातील कलाकृतींमध्ये केवळ तांत्रिक कौशल्यच नाही, तर कलाकारांच्या सांस्कृतिक आणि वैयक्तिक अनुभवांचाही सुंदर प्रकट होतो,” असे डॉ. संजीव किशोर गौतम -महासंचालक, एनजीएमए (Director General, NGMA) यांनी सांगितले.

विक्रोळीकरांचा त्रास कमी होणार

 

“इतिहासात अनेकदा महिला प्रिंटमेकर्सचे योगदान दुर्लक्षित राहिले आहे. पण त्यांनी साकारलेली प्रत्येक कलाकृती – एचिंगच्या नाजूक रेषा असोत की लिनोकटचे ठसठशीत स्वरूप – ही त्यांच्या सर्जनशीलतेची, ताकदीची आणि चिकाटीची साक्ष आहे. ‘नभ:स्पर्श’द्वारे एनजीएमए या आवाजांना केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न करत आहे,” असे मत निधी चौधरी – संचालिका, एनजीएमए (Director, NGMA) यांनी व्यक्त केले.

‘नभ: स्पर्श – इंडियन वुमन प्रिंटमेकर्स’ हे प्रदर्शन नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (NGMA), मुंबई, (सर कोवासजी जहांगीर पब्लिक हॉल, फोर्ट) येथे २५ मे २०२५ पर्यंत सर्वसामान्यांसाठी खुले असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *