मुख्य बातम्याशहर

महाराष्ट्रातून पाकिस्तानी नागरिक ताबडतोब चालते व्हा! –उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

बुलढाणा : 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचा आदेश दिला आहेत. महाराष्ट्रात पाकिस्तानी नागरिक जिथे असतील तिथून पाकिस्तानात ताबडतोब चालते व्हा, अन्यथा पोलीस तुम्हाला जागेवरच ठोकतील, असा निर्वाणीचा इशाऱा शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिला. बुलढाणा येथे आयोजित आभार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय राठोड, माजी आमदार संजय रायमूलकर, आनंदराव अडसूळ, शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे आणि बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पहलगामध्ये झालेला हल्ला हा देशाच्या शत्रूने भारताच्या आत्म्यावर केलेला हल्ला आहे. पाकिस्तानचे कायमचे कंबरडे मोडून नामोनिशाण मिटवले पाहिजे, ही समस्त भारतीयांची भावना आहे. जो आमच्यावर हल्ला करेल तो संपून जाईल, आता पाकिस्तानला संपवायची वेळ आलीय, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. केंद्र सरकार काम करतंय, दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करायला सुरुवात झालीय. महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ पाकिस्तानात जा, त्यांना आसरा देणाऱ्या सापांना बिळातून ओढून बाहेर काढू, असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. ही देशभक्तीची लढाई आहे आणि देशाच्या सुरक्षेसाठी आमचा शिवसैनिक देशाच्या जवानासारखा लढल्याशिवाय राहणार नाही. हा शेवटचा हल्ला असेल यापुढे हल्ला करण्याचे धाडस त्यांच्यात उरणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. ही आरपारची लढाई आहे, हा घरात घुसुन हल्ला करणारा भारत आहे, व्होट बँक आणि मतांच्या लाचारीसाठी शेपूट घालणारा भारत नाही, असे ते म्हणाले. सर्व भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी आहेत, असे ते म्हणाले.

रणरणत्या उन्हात हजारो बुलढाणावासीयांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी गर्दी केली होती. उपमुख्यमंत्री शिंदे या गर्दीला खास धन्यवाद दिले आणि निवडणुकीत सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. ते पुढे म्हणाले की, जेव्हा आपत्ती येते तेव्हा शिवसैनिक म्हणून सगळी टीम घेऊन तेथे मदतीसाठी धावून जातो. ज्या दिवशी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला त्याच दिवशी रात्री खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची टीम श्रीनगरला पोहोचली होती. तेथे थांबलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी संपर्क साधून दिला. यात कोणी पती गमावला तर कोणी भाऊ गमावला होता, कोणी कुटुंबातील सदस्य गमावला होता, अशा या निरपराध पर्यटकांच्या मानसिक अवस्थेची मला जाणीव झाली. त्यांना मानसिक आधार आवश्यक होता. लवकरात लवकर घरी परतायचं अशी त्यांची भावना होती जी त्यांनी फोनवर व्यक्त केली. त्यामुळेच मी अस्वस्थ मनाने श्रीनगर गाठले पर्यटकांना महाराष्ट्रात परतण्यासाठी व्यवस्था केली. यातून ४५० पर्यटकांना परत आणले तर बुलढाण्यातील ५१ पर्यटक सुखरुप घरी पोहोचले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

कुठेही आपत्ती आली की एक सच्चा शिवसैनिक या कर्तव्याने तिथं बचाव पथकासह जातो, मात्र काही जण घरातून बाहेर पडत नाहीत, घरातून बाहेर पडलेच तर थेट परदेशात जातात, अशी सडकून टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. मराठी बांधवांना परत आणण्याचे कर्तव्य समजून श्रीनगरला गेलो, अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली. मराठी बांधवांना परत आणणे हे कर्तव्य समजून श्रीनगर गेलो, मात्र त्यावरुन काहीजणांनी राजकारण केले. सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्यांनी जनाची नाही मनाची तरी ठेवावी. पर्यटकांच्या मृत्यूंमध्ये त्यांना राजकारण दिसते. कोविडमध्ये मृतांच्या टाळुवरचे लोणी खाणारे पाहिले आणि आता पहलगाम हल्ल्याचे राजकारण करणारेही पाहिले, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठा गटावर केली.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने राजकीय तापमान वाढवले. त्याचे जोरदार चटके विरोधकांना बसले त्यामुळेच ते थंडगार हवा खाण्यासाठी परदेशात गेलेत. राज्यातील लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांनी विरोधकांना गप्पगार केलं त्यासाठी मी बुलढाणावासीयांचे आभार मानायला आलोय, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. मागील अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून राज्यात जे काम केलं त्यामुळेच जनतेने महायुतीला ऐतिहासिक विजय मिळवून दिला, असे ते म्हणाले. काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्याचे काम आम्ही केले. गेलेला एकही आमदार निवडून येणार नाही, असे उबाठा म्हणत होते. मात्र गेले होतो ४० आणि निवडून आले ६०, त्यातील ७ ते ८ जागा किरकोळ मतांनी पराभूत झाल्या, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. बाळासाहेबांचे विचार, धर्मवीर आनंद दिघेंचे विचार पुढे घेऊन जाणारी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय देणारी शिवसेना कोणाची यावर महाराष्ट्राच्या जनतेने शिक्कामोर्तब केले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. निवडणुकीत लाडक्या बहिणींनी विरोधकांना जोडा दाखवला आणि चांगला वाजवला, असे ते म्हणाले. सत्ता येईल सत्ता जाईल पण नाव जाता कामा नये, असे बाळासाहेब सांगायचे. त्यासाठी शिवसेना काम करत आहे, असे ते म्हणाले. सर्वसामान्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्याचे काम शिवसेना करतेय, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री असताना बुलढाणा जिल्ह्याला ११०० कोटींचा निधी दिला. मराठवाडा विदर्भातील सिंचन प्रकल्प सुरु केले. विदर्भाचे महाद्वार असलेल्या बुलढाण्याला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. अडीच वर्ष आरोप करणारे आता एसंशि म्हणतात त्यावर ते म्हणाले की, एसंशी म्हणजे एसंशिअल अर्थात राज्यातील लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या भावांसाठी आणि लाडक्या ज्येष्ठांसाठी हा एकनाथ शिंदे आवश्यकच आहे. एसंशि म्हणजे एक संवदेनशील शिवसैनिक आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तत्पूर्वी आभार सभेचे आयोजक आमदार संजय गायकवाड म्हणाले की, मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी बुलढाणा जिल्ह्याला जे दिले ते मागील ७० वर्षांत मिळाले नव्हते. अडीच वर्षात सिंचनाबाबत घेतलेल्या निर्णयांमुळे जिल्ह्यातील सिंचनाचे क्षेत्र १०३ हेक्टरवरुन ६५० हेक्टरपर्यंत वाढले आहे. त्याचबरोबर भविष्यात बुलढाणा जिल्ह्यातील १०० टक्के क्षेत्र सिंचनाखाली येईल, असा विश्वास आमदार गायकवाड यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *