
मुंबई :
देशात ४ मे रोजी होणाऱ्या नीट परीक्षेमुळे सीईटी परीक्षेत बदल (Exam Reschedule) करण्यात आला आहे. त्यानुसार ४ मे रोजी होणारी विधी अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा २ मे रोजी घेण्यात येणार आहे. २ मे रोजी जवळपास ५७ हजार विद्यार्थ्यांची परीक्षा हाेणार आहे. तसेच २ मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीचे हॉलतिकिट विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले आहे.
देशामध्ये ४ मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत (एनटीए) राज्यातील काही जिल्हा परीक्षा केंद्रे आरक्षित केली आहेत. यामध्ये सरकारी महाविद्यालये व संस्थांचा समावेश आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेकडून नीट परीक्षेसाठी राज्यातील २८ सरकारी महाविद्यालये परीक्षा केंद्रासाठी आरक्षित केली आहेत.
ही परीक्षा केंद्रे सीईटी सेलकडूनही आरक्षित करण्यात आली होती. एनटीएने आरक्षित केलेल्या परीक्षा केंद्रांची माहिती २२ व २३ एप्रिल रोजी सीईटी कक्षाला दिली. नीट ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे. या परीक्षेला लाखो विद्यार्थी बसतात. त्यामुळे नीटसाठी आरक्षित केलेल्या या केंद्रांचा सीईटीसाठी वापर करता येणार नाही. नीट परीक्षेसाठी एनटीएने आरक्षित केलेल्या केंद्रामुळे जवळपास ८ ते ९ हजार विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा देता येणार नाही.
तसेच मे महिन्यामध्ये राज्यातील विविध विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू होणार आहेत. विधी तीन वर्ष अभ्यासक्रमासाठीची सीईटीच्या तारखा पुढे ढकलल्यास केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला (कॅप राऊंड) विलंब होऊ शकतो तसेच महाविद्यालय विलंबाने सुरू होऊ शकतात.
त्यामुळे विधी तीन वर्षे अभ्यासक्रमाची सीईटी पुढे ढकलणे शक्य नाही. परिणामी सीईटी कक्षाने ४ मे रोजी होणारी विधी तीन वर्षे अभ्यासक्रमाची सीईटी २ मे रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर ३ मे रोजी होणारी सीईटी ही नियोजित वेळापत्रकानुसार होणार असल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितले.
लॉ अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी ९५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या सर्व विद्यार्थांना २८ एप्रिल रोजी दुपारी २ नंतर त्यांच्या लाॅगिन आयडीवर हॉल तिकिट पाठविण्यात आले आहे. नव्या वेळापत्रकानुसार २ मे रोजी ५७ हजार विद्यार्थ्यांची तर ३ मे रोजी ३८ हजार विद्यार्थ्यांची परीक्षा हाेणार आहे.
तसेच सीईटी परीक्षेच्या नियोजनात करण्यात आलेल्या बदलाची माहिती विद्यार्थ्यांना एसएमएस, व्हॉट्सअप, नोंदणीकृत इमेल आयडी, संकेतस्थळावर जाहीर सूचना या माध्यमातून कळविण्यात आल्याचे सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितले.
परराज्यातील विद्यार्थ्यांची ३ मे रोजी परीक्षा
परराज्यातून सीईटी परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी तिकिट आरक्षणाबरोबरच राहण्याची आगाऊ व्यवस्था करावी लागते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा त्रास वाढू नये यासाठी परराज्यातील विद्यार्थ्यांची परीक्षा ३ मे रोजी घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात ‘दीनदयाल उपाध्याय अध्यासन’ स्थापन करण्यात येणार
सीए, सीएसची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा
सीए व सीएसची परीक्षा ही ४ मे रोजी होणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांना ४ मे रोजी होणाऱ्या परीक्षेत बदल करण्याची विनंती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडे केली होती. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळणार आहे.