मुख्य बातम्याशहर

माजी महापौर दत्ता दळवी यांचा शिवसेनेत प्रवेश; शिवसेनेचा पुन्हा एकदा उबाठा गटाला झटका

मुंबई : 

महायुती सत्तेत आल्यानंतर सरकारने मुंबई स्वच्छ करण्याचे काम केले. ब्रिटीशांनंतर महायुती पहिल्यांदा मुंबईचे रस्ते धुतले गेले मात्र त्याआधी काहीजणांनी मुंबईची तिजोरी साफ केली, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज केली. मुंबईचे माजी महापौर आणि उबाठाचे उपनेते दत्ता दळवी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिंदे बोलत होते. या पक्ष प्रवेशाला मंत्री भरत गोगावले, खासदार संदिपान भुमरे, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबई महापालिका काहीजण स्वत:ची जहागिरीदारी समजत होते. मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर मुंबईतील रखडलेले प्रकल्प सुरु केले. मुंबईकरांना हक्काची घरे, आरोग्य सुविधा देण्याचे काम सरकार करतेय. आतापर्यंत उबाठाचे ४५ ते ५० नगरसेवक मूळ शिवसेनेत परतले आहेत. मुंबई पालिकेतील विविध पक्षांच्या जवळपास ७० विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

आज दळवी यांच्यासह धारावी, विक्रोळी, कांजूर, भांडूप. मुलुंडमधील महिला विभाग अध्यक्ष, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख ५०० हून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. या पक्ष प्रवेशाने विक्रोळीत उबाठा गटाला खिंडार पडले. त्याचबरोबर मुरबाडमधील उबाठा तालुका प्रमुख, उप तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, विधानसभा क्षेत्र संघटक, युवा सेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जळगाव जिल्ह्यातील काँग्रेस, उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जवळपास दोन हजार कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. सोलापूर येथील मंगळवेढा तालुक्यातील १८ सरपंचांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. छत्रपती संभाजी नगरमधून ओबीसी महासंघाचे २२ जिल्हाध्यक्ष, हिंदुस्थान चित्रपट कामगार सेना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच पिंटो यांच्यासह असंख्य ख्रिस्ती बांधवांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मागील अडीच वर्षांपासून सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. बाळासाहेबांचे विचार, धर्मवीर आनंद दिघेंचे विचार आणि विकास प्रकल्प पुढे नेण्याचे काम आपण करतोय. दिलेला शब्द पाळतो त्यामुळे लाखो कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत. विधानसभेत ८० जागा लढून ६० जागा जिंकलो तर उबाठा १०० लढून अवघ्या २० जागा जिंकता आल्या. जनतेने खरी शिवसेना कोणाची यावर शिक्कामोर्तब केलंय. आता स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा डौलाने फडकवायचा आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. लोक सोडून का जातात याचे आत्मपरिक्षण करण्याऐवजी त्यांच्यावर आरोप केले जातात. त्यांना कचरा म्हणता मात्र एक माणूस बरोबर आणि लाखो चूक कसे असू शकतात, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. पहलगाममधील हल्ल्याचा आम्ही निषेध केला. पर्यटकांच्या पाठिशी शिवसेना आणि सरकार पूर्ण ताकदीशी आहेत. मात्र या घटनेवर राजकारण कुणी करु नये, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *