मुख्य बातम्याशिक्षण

University:‘युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई लॉ एकेडमी’ (उमला) ची ऐतिहासिक कामगिरी; आंतरराष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धेत उपविजेतेपद

आंतरराष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धेत कॅनडा, ब्राझील, स्वीडन, यूके, मेक्सिको, साऊथ आफ्रिका आणि फ्रान्स या देशातील १२ चमू सहभागी झाले होते.

मुंबई :

मुंबई (University) विद्यापीठाच्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई लॉ एकेडमी’ (उमला) ने ऐतिहासिक कामगिरी करत आंतरराष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धेत उपविजेते पदाचा बहुमान पटकावला. २३ ते २५ एप्रिल २०२५ दरम्यान स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे या आंतरराष्ट्रीय मूट कोट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. युनायटेड नेशनच्या वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गेनायझेशन (WIPO ) तर्फे आयपी मूट कोर्ट या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

उमलात विधीचे शिक्षण घेणाऱ्या आर्या गौतम आणि संस्कृती शर्मा यांनी ‘जनरेटिव्ह एआय आणि कॉपीराइट कायदा’ या विषयावर उत्तम सादरीकरण करून जागतिक स्तरावर साओ पावलो विद्यापीठ आणि ओटावा विद्यापीठासारख्या इतर प्रतिष्ठित संस्थांना मागे टाकत उपविजेते पदाचा बहुमान मिळवला. या आंतरराष्ट्रीय मूट कोर्ट स्पर्धेत कॅनडा, ब्राझील, स्वीडन, यूके, मेक्सिको, साऊथ आफ्रिका आणि फ्रान्स या देशातील १२ चमू सहभागी झाले होते.

कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीर विचारांमधील स्पष्टता, बौद्धिक संपदा जागरूकता आणि नवोपक्रमाला चालना देण्याच्या उद्देश्याने संयुक्त राष्ट्रांची विशेष एजन्सी असलेल्या जागतिक बौद्धिक संपदा संघटनेमार्फत या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन जगभरात करण्यात आले होते. दोन निवड फेऱ्यांचा समावेश असलेल्या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर २०२४ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या चमूने व्हीडीओ सादरीकरण केले, ज्यामध्ये फक्त १८ संघ पुढील टप्प्यात पोहोचले.

२५ ते २७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान झालेल्या दुसऱ्या टप्प्यात या चमूने आभासी फेरीत एका जटिल कायदेशीर काल्पनिक प्रकरणावर युक्तिवाद करून जगात प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. साओ पाउलो विद्यापीठ (दुसरे), नॅशनल लॉ यूनिवर्सिटी दिल्ली (तिसरे) आणि ओटावा विद्यापीठ (चौथे) सारख्या आघाडीच्या संस्थांमधील स्पर्धकांमध्ये प्रथम क्रमांक पटकावण्याचा बहुमान विद्यार्थ्यांना मिळाला होता. अंतिम फेरीत उपविजेते पदाचा सन्मान करत या यशामुळे आम्हाला उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करत राहण्याची आणि बौद्धिक संपदा कायद्याच्या क्षेत्रात अर्थपूर्ण योगदान देण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे समाधान आर्या गौतम आणि संस्कृती शर्मा यांनी व्यक्त केला.

कॅस प्रक्रियेतील अडचणीमुळे शेकडो प्राध्यापक लाभापासून दूरच

 

या चमूला उमलाच्या संचालक प्रा. राजेश्री वऱ्हाडी यांचे मार्गदर्शन लाभले. कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उपविजेते पदाचा बहुमान मिळवत मुंबई विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याबद्दल कुमारी आर्या आणि संस्कृती यांचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *