
मुंबई :
राज्य समाईक प्रवेश परीक्षाकक्षाकडून २७ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी २०२५ (पीसीएम गट) प्रवेश परीक्षेच्या सकाळच्या सत्रामध्ये इंग्रजी माध्यमातील गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांना २१ प्रश्नांना चुकीचे पर्याय देण्यात आले होते. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत या सत्रातील २७ हजार ८३७ विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. ही फेर परीक्षा दिनांक ५ मे २०२५ रोजी होणार असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार असल्याने पालक व विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
एमएचटी-सीईटी पीसीएम गटाची परीक्षा १९ एप्रिल ते २७ एप्रिल २०२५ दरम्यान १५ सत्रांमध्ये १९७ परीक्षा केंद्रांवर पार पडली. एकूण ४,६४,२६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी ४,२५,५४८ उमेदवारांनी परीक्षा दिली. २७ एप्रिलच्या सकाळी घेतलेल्या सत्रात इंग्रजी, मराठी व उर्दू माध्यमांतून एकूण २७ हजार ८३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. परीक्षेनंतर गणिताच्या विषयामध्ये २० ते २५ प्रश्नांचे पर्याय चुकीचे आल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी सीईटी कक्षाकडे तक्रार केली होती. याची दखल घेत सीईटी कक्षाने सीईटी कक्षाने तज्ज्ञांमार्फत प्रश्नपत्रिकेची पडताळणी केली असता विद्यार्थ्यांच्या आरोपामध्ये तथ्य असल्याचे आढळून आले. इंग्रजीमधील पेपरमध्ये २१ प्रश्नांचे पर्याय चुकले असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे २७ हजार ८३७ विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय सीईटी कक्षाकडून घेण्यात आला आहे. ही फेर परीक्षा ५ मे रोजी घेण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत मेसेज, ईमेल, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कळविण्यात येणार आहे. तसेच संबंधित उमेदवारांनी अधिकृत www.mahacet.org या वेबसाइटवर भेट देऊन अद्ययावत माहितीची नोंद घ्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाचे आयुक्त सरदेसाई यांनी केले आहे
परीक्षेला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचीच होणार परीक्षा
एमएचटी सीईटीच्या अखेरच्या सत्रासाठी ३१ हजार २० विद्यार्थ्यांची नोंद होती. त्यातील २७ हजार ८३७ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये २४ हजार ७४४ विद्यार्थ्यांनी इंग्रजीमधून, २ हजार ८७५ विद्यार्थ्यांनी मराठीतून आणि २१८ विद्यार्थ्यांनी उर्दूतून परीक्षा दिली होती. परीक्षेला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांचीच पुन्हा परीक्षा हाेणार असून, गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार नसल्याचेही आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितले.