
मुंबई :
कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशतर्फे (सीआयएससीई) घेण्यात आलेल्या दहावी (आयसीएसई) आणि बारावी (आयएससी) परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रासह देशामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. देशामध्ये दहावीचा निकाल ९९.०९ टक्के तर बारावीचा निकाल ९९.०२ इतका लागला आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचा निकाल अधिक चांगला लागला आहे. महाराष्ट्रामध्ये दहावीचा निकाल ९९.९० टक्के तर बारावीचा निकाल ९९.८१ टक्के इतका लागला. दहावीच्या निकालामध्ये ९९.९२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, ९९.८९ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे बारावीच्या निकालामध्येही मुलींचा वरचष्मा राहिला असून, बारावीच्या निकालामध्ये मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.९५ टक्के असून, मुलांचे प्रमाण ९९.६५ टक्के इतके आहे.
आयसीएसई मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये यंदा देशभरातून २ लाख ५२ हजार ५५७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील २ लाख ५० हजार २४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर २ हजार ३०८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांची संख्या १ लाख ३३ हजार १३९ तर मुलींची संख्या १ लाख १७ हजार ११० इतकी आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल ९९.०९ टक्के लागला असून, यामध्ये मुलींचा निकाल ९९.३७ टक्के तर मुलांचा निकाल ९८.८४ टक्के इतका लागला आहे. आयसीएसईच्या निकालामध्ये दक्षिण विभागाचा निकाल सर्वाधिक ९९.७६ टक्के इतका लागला आहे. त्याखालोखाल पश्चिम विभागाचा निकाल ९९.७२ टक्के, उत्तर विभाग ९८.९७ टक्के, पूर्व विभाग ९८.७६ टक्के तर ईशान्य विभागातून ९७.९६ टक्के इतका निकाल लागला आहे. देशाप्रमाणे महाराष्ट्रातही मुलींनी निकालामध्ये बाजी मारली आहे. महाराष्ट्रामधून २९ हजार २८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील २९ हजार २५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये १५ हजार ७०४ मुले तर १३ हजार ५५० मुली उत्तीर्ण झाल्या. निकालामध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलांचे प्रमाण ९९.८९ टक्के तर मुलींचे प्रमाण ९९.९२ टक्के इतके आहे. दहावीला ६७ विषयांची परीक्षा घेण्यात येते. यामध्ये २० भारतीय भाषा, १४ परदेशी भाषा आणि एक शास्त्रीय भाषेचा समावेश असतो.
आयएससी मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेला देशातून ९९ हजार ५५१ विद्यार्थी बसले होते. त्यातील ९८ हजार ५७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये मुली ४६ हजार ९५२ मुली उत्तीर्ण झाल्या असून, त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.४५ टक्के आहे. तर ५१ हजार ६२६ मुले उत्तीर्ण झाले असून, त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९८.६४ टक्के इतके आहे. बारावीच्या परीक्षेला महाराष्ट्रातून ३ हजार ७२३ विद्यार्थी बसले होती. त्यातील ३ हजार ७१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर सात विद्यार्थी अनुतीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये १ हजार ७१२ मुले (९९.६५ टक्के) असून, २००४ (९९.९५ टक्के) मुली आहेत. बारावीला ४७ विषयांची परीक्षा घेण्यात येते. यामध्ये १२ भारतीय भाषा, चार परदेशी भाषा आणि दोन शास्त्रीय भाषांचा समावेश असतो.
निकाल
- दहावी – ९९.०९ टक्के
- बारावी – ९९.०२ टक्के
महाराष्ट्राचा निकाल
आयसीएसई (दहावी)
- परीक्षेला बसलेले विद्यार्थी – २९,२८२
- उत्तीर्ण २९,२५४
- टक्केवारी ९९.९० टक्के
आयएससी (बारावी)
- परीक्षेला बसलेले विद्यार्थी ३७२३
- उत्तीर्ण ३७१६
- टक्केवारी ९९.८१ टक्के