
मुंबई :
शहरामध्ये अनेक ठिकाणी एसआरए अंतर्गत पुनर्विकासाच्या प्रक्रिया सुरू आहेत, यामध्ये अनेक ठिकाणी होत असलेल्या गैरकारभाराला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांना त्यासंदर्भात सहज तक्रारी (Complaint Portal) दाखल करणे शक्य व्हावे या अनुषंगाने मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणकडून स्वतंत्र अद्ययावत संकेतस्थळ नागरिकांसाठी तयार करण्यात आले आहे.
त्यामुळे नागरिकांना आता घरबसल्या एसआरए प्रकल्पातील गैरव्यवहार व अन्य तक्रारींबरोबरच भाडेविषयक तक्रारी करणे सहज शक्य हाेणार आहे. मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण या संकेतस्थळावर आतापर्यंतची प्राधिकरणासंदर्भातील सर्व परिपत्रके तसेच महाराष्ट्र झोपडपट्टी (सु.नि.व.पु) अधिनियम १९७१ ची लिंक आणि इतर लोकपयोगी अद्ययावत माहिती उपलब्ध करण्यात आलेली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार १०० दिवसांमध्ये ७ कलमी कृती आराखडा प्रभावीपणे राबविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी नियोजनबध्द कार्यवाही करून अंमबलबजावणी करण्याचे निर्देश प्राधिकरणातील सर्व अधिकारी यांना दिलेले होते. १०० दिवसांचा कृती आराखड्याच्या अनुषंगाने प्राधिकरणाविषयी माहिती देणारे अद्ययावत संकेतस्थळ सर्वसामान्य नागरिकांकरीता तात्त्काळ उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या.
त्याअनुषंगाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (NIC) यांच्याकडून GIGW च्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे अद्ययावत माहितीसह व हाताळण्यास सुलभ असे प्राधिकरणाचे संकेतस्थळ (https://srammr.maharashtra.gov.in/) तयार करण्यात आले आहे. मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणच्या या संकेतस्थळावर प्राधिकरणाच्या एकूण 22 सेवा अधिसूचित करून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५, माहिती अधिकार अधिनियम-२००५ची माहिती, प्राधिकरणाची परिपत्रके तसेच महाराष्ट्र झोपडपट्टी (सु.नि.व.पु) अधिनियम १९७१ ची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याव्यतिरिक्त इतर लोकपयोगी अद्ययावत माहिती उपलब्ध करण्यात आलेली आहे.
एसआरए योजनेतील झोपडीधारकांच्या भाडे विषयक तक्रारींकरिता मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणमार्फत ऑनलाईन ‘भाडे व्यवस्थापन प्रणाली’ सुरू करण्यात आलेली आहे. आता झोपडीधारकांना भाडे विषयक तक्रार करण्यासाठी प्राधिकरणात फेऱ्या माराव्या लागणार नाही. घर बसल्या ऑनलाईन तक्रार करता येईल.
अखेर मुजोर पेंढारकर महाविद्यालयाने व्यवस्थापनाला नमवले
यामुळे तक्रारीची सद्यस्थिती व माहिती झोपडीधारकांना ऑनलाईन घर बसल्या उपलब्ध होणार आहे. नागरिकांकरीता प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर (मुख्यपृष्ठ ≥ नागरिकांविषयी ≥ तक्रार निवारण ≥ भाडे तक्रार निवारण प्रणाली) सदरची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याव्यतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार आजमितीसपर्यंत झोपडीधारकांच्या प्राप्त झालेले आपले सरकार व पीजी पोर्टलवरील सर्व तक्रारींचा निपटारा करून प्रलंबित तक्रारींचे प्रमाण शून्य करण्यात आलेले आहे.