मुख्य बातम्याशहर

Cleanliness:स्वच्छ मुंबईसाठी, एक छोटा बदल पुरेसा आहे!

BMC आपल्या परीने सगळं करत आहे, पण प्रत्येक जण थोडा जबाबदार झाला, तर बदल वेगाने दिसेल.

मुंबईमध्ये थांबायला कोणालाच वेळ नाही, प्रत्येक जण धावतोय, पुढे जातोय. पण या धावपळीत आपण रोज तयार करत असलेल्या कचऱ्याकडे (Cleanliness) किती जण लक्ष देतो? आपलं शहर दररोज हजारो टन कचरा निर्माण करतं, आणि त्याचे नीट व्यवस्थापन केले नाही तर तो आपल्या आरोग्यावर आणि परिसरावर परिणाम करतो. पण हे इतकं अवघडही नाही. थोडा बदल, नवी सवय, आणि आपणच आपल्या शहराला अधिक स्वच्छ, सुंदर बनवण्याची इच्छा पुरेशी आहे.

कचऱ्याचा गुंता सोडवायचा, तर सुरुवात घरीच करावी लागेल

कचरा फेकणं ही आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्यांमधील एक महत्त्वाची जबाबदारी आहे. पण सगळा कचरा टाकून द्यायचा नसतो. खत तयार करणे, रिसायकल करणे या सारख्या गोष्टींमुळे बऱ्यापैकी कचऱ्याचा पुनर्वापर होऊ शकतो. म्हणूनच कचऱ्याचे वर्गीकरण गरजेचं आहे. ही एक छोटी सवय आपण लावून घेतली, तर पुढचं काम सोपं होतं.

BMC काय करतंय?

मुंबई महानगरपालिका फक्त कचरा गोळा करणं आणि फेकणं एवढंच करत नाही, तर त्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी विविध उपाय सुद्धा राबवत आहे. कचऱ्याच्या विलगीकरणावर भर दिला जातोय, अत्याधुनिक प्रक्रिया केंद्रांमधून पुनर्वापर योग्य पदार्थ वेगळे काढले जात आहेत. ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार केलं जातं आहे. त्याशिवाय, नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांसाठी दंड आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी खास मोहिमा राबवल्या जात आहेत.

आपण काय करू शकतो?

काही मोठं करण्याची गरज नाही – आपण फक्त काही छोट्या सवयी अंगीकारल्या तरी खूप फरक पडतो. घरात ओला – सुका कचरा वेगळा करणं, प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणं, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणं आणि शक्य असेल तिथे कंपोस्टिंग करणं – हे चार साधे नियम पाळले, तरी आपलं शहर खूप वेगळं आणि सुंदर दिसेल.

मुंबई बदलतेय, आपणही तयार आहात ना?

स्वच्छतेसाठी मोठमोठ्या योजना आणि उपक्रम महत्त्वाचे आहेत, पण खरी ताकद मुंबईकरांमध्ये आहे. BMC आपल्या परीने सगळं करत आहे, पण प्रत्येक जण थोडा जबाबदार झाला, तर बदल वेगाने दिसेल. मुंबईचं सौंदर्य राखायचं असेल, तर सुरुवात स्वतःपासून करायला हवी. चला, हा बदल घडवूया!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *