
ठाणे :
साईराज पाटीलची विस्फोटक फलंदाजी आणि तेवढ्या नियंत्रित गोलंदाजीमुळे एफटीएल एकादश संघाने (Sports) स्पोर्टसमन क्रिकेट क्लबचा ६४ धावांनी पराभव करत महाराष्ट्र माझा सेवा संस्था आयोजित १३ व्या उपमुख्यमंत्री चषक ठाणे प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत विजयाचे खाते खोलले. साईराजच्या धुवांधार १२९ धावांमुळे २४४ ,धावांचे लक्ष्य दिल्यावर जेत्या संघाच्या गोलंदाजांनी स्पोर्टसमन क्रिकेट क्लबला १८० धांवावर रोखत विजय निश्चित केला.
प्रथम फलंदाजी करताना साईराजने एकहाती संघाला द्विशतकी धावसंख्या उभारून दिली. साईराजने सुरुवातीपासूनच गोलंदाजांना सळो की पिळो करुन सोडताना ३० चेंडूत शतक पूर्ण केले. आपल्या १२९ धावांच्या झंझावती खेळीत साईराजने ४१ चेंडूत ११ चौकार आणि एक डझन षटकारांची आतषबाजी केली.
याशिवाय तिसऱ्या गड्यासाठी यतीन मढवीच्या साथीने ११६ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. अजय पाटीलने २७ धावांची भर टाकली. या डावात अकिब शेखने दोन, केतन खरात, सैफ शेख आणि गरीब डोलारेने प्रत्येकी एक बळी मिळवला.
उत्तरादाखल संकेत जाधव आणि अकिब शेखने चांगली फलंदाजी करत संघाला विजयाची आस दाखवली पण इट फलंदाजाकडून योग्य ती साथ न मिळाल्याने स्पोर्ट्समन क्रिकेट क्लबला पराभव पत्करावा लागला.संकेतने २७ चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकार मारत ४२ धावा केल्या.
अकिबने तीन षटकार मारत २२ चेंडूत ३७ धावा केल्या. गोलंदाजीतही आपली छाप पाडताना साईराजने आणि ऋषिकेश जाधवने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. नवीन शर्मा, चंदन सोनी आणि विकास पांडेने प्रत्येकी एक बळी मिळवला.
Sports:पुरुष गटात स्वस्तिकची जेतेपदाची हॅटट्रिक; महिलांमध्ये डॉ. शिरोडकर क्लब विजेता
संक्षिप्त धावफलक : एफटीएल एकादश : २० षटकात ६ बाद २४४ ( साईराज पाटील १२९, यतीन मढवी ३४, अजय पाटील २७, अकिब शेख ४-३३-२, केतन खरात ३-४५-१, सैफ शेख ४-३५-१, अरीब डोलारे ३-३४-१) विजयी विरुद्ध स्पोर्ट्समन क्रिकेट क्लब : २० षटकात ७ बाद १८० (संकेत जाधव ४२, अकिब शर्मा ३७, साईराज पाटील ४-५०-२, ऋषिकेश जाधव ४-३३-२, नवीन शर्मा ४-३५-१, चंदन सोनी ३-३७-१, विकास पांडे २-१०-१).