मुख्य बातम्याशहर

दिल्लीत पाहता येणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा देदिप्यमान इतिहास

नवी दिल्ली :

छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा देदिप्यमान इतिहास डोळे दिपवणाऱ्या संग्रहालयाच्या माध्यमातून जनतेसमोर उभा करण्यात येत आहे. या संग्रहालयाचे काम अंतिम टप्प्यात असून या संग्रहालयाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल, अशी माहिती समितीचे महासचिव कर्नल मोहन काक्तीकर (सेवानिवृत्त), मिलिंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गार्डियन मीडिया आणि इंटरटेनमेंटचे संचालक संजय दाबके उपस्थित होते. दाबके यांच्या माध्यमातून अत्याधुनिक अद्ययावत असे संग्रहालय मूर्त रूपात उभे राहत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल राष्ट्रीय समिती ही दिल्लीतील इन्स्टिट्यूशनल एरिया कुतुब एन्क्लेव्ह या ठिकाणी आहे. या इमारतीचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले होते. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जागतिक दर्जाचे ऐतिहासिक संग्रहालय राजधानी दिल्लीत असावे असा मानस समितीचा होता. त्याप्रमाणे 2020 पासून यावर काम सुरू आहे. देशभरातील जनतेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यातून घ्यावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संग्रहालय उभारण्यात येत असल्याची माहिती काक्तीकर यांनी यावेळी दिली.

हे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने तयार करण्यात आलेले आहे. पाच मजली इमारतीच्या तळ मजल्यात हे संग्रहालय आहे. या संग्रहालयातील वस्तू ऐतिहासिक दस्ताऐवजांच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या आहेत. संग्राहालय पाहताना त्या काळातील अनुभव घेता येईल. संग्रहालयातील काही भागांमध्ये थ्रीडी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

यासह डार्क राईडच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांना पाहता येईल. हे देशातील एक अभूतपूर्व असे संग्रहालय असणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *