क्रीडा

१३ व्या ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा : रोमहर्षक सामन्यात एफटीएल विजयी

ठाणे :

शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात एफटीएल एकादश संघाने अवघ्या एका धावेने एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अ संघावर सरशी मिळवत महाराष्ट्र माझा सेवा संघ आयोजित उपमुख्यमंत्री चषक १३ व्या ठाणे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. एफटीएल संघाच्या ९ बाद १७७ धावांचा पाठलाग करताना एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अ संघाला ८ बाद १७६ धावांपर्यंत मजल मारता आली.

नाणेफेक जिंकल्यावर क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अ संघाच्या गोलंदाजांनी पहिल्या तीन षटकात दोन महत्वाचे फलंदाज माघारी पाठवत प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणले होते. पण यतीन मढवीच्या अर्धशतकी खेळीला अरुण यादव आणि अजय पाटीलने तेवढीच तोलामोलाची साथ मिळाल्याने एफटीएल एकादश संघाला १७७ धावांचा पल्ला गाठता आला. यतीनने नाबाद ६२, अरुणने ३९ आणि अजयने नाबाद २५ धाव केल्या. फलंदाजाना रोखताना मोहित अवस्थीने चार, विद्याधर कामतने दोन, शम्स मुलानी आणि रोहन राजेने प्रत्येकी एक बळी मिळवला.

मर्यादित धावसंख्येचा आव्हानाचा पाठलाग करताना फलंदाजांनी एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अ संघाला विजयाची आस दाखवली. पण शेवटच्या षटकात एफटीएलच्या गोलंदाजांनी फलंदाजाना वरचढ होण्याची साधी मिळू दिली नाही. सोहम बेंडेने ६१ धाव करत एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब अ संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहचवले होते. त्यापाठोपाठ साहिल जाधवने २२, हर्ष उबाळेने ३५, शशिकांत कदमने नाबाद २७ धावा बनवल्या. फलंदाजीत अपयशी ठरलेल्या साईराज पाटीलने चार बळी मिळवत प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजाना धावा बनवण्यापासून रोखले. विकास पांडेने दोन आणि अजय मिश्राने एक बळी मिळवला.

संक्षिप्त धावफलक : एफटीएल एकादश : २० षटकात ९ बाद १७७ ( यतीन मढवी ६२, अरुण यादव ३९, अजय पाटील नाबाद २५, मोहित अवस्थी ४-२४-४ , विद्याधर कामत ३-१९-२, शम्स मुलानी ४-१-३५-१, रोहन राजे ४-३७-१) विजयी विरुद्ध एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब (अ) : २० षटकात ८ बाद १७६ ( साहिल जाधव २२, सोहम बेंडे ६१, हर्ष उबाळे ३५, शशिकांत कदम नाबाद २७, साईराज पाटील ४-३६-४, विकास पांडे ४-३०-२, अजय मिश्रा ४-२४-१ ).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *