
मुंबई :
भारतीय वायूसेनेने मंगळवारी मध्यरात्री पाकिस्तानच्या हद्दीत घुसून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. मध्यरात्री दहशतवाद्यांचे तळांवर हल्ले करुन भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल शिवसेनेकडून केंद्र सरकार आणि सेना दलाचे जाहीर अभिनंदन करण्यात आले. शिवसैनिकांनी बाळासाहेब भवनाबाहेर फटाके फोडून आणि मिठाई वाटून जल्लोष साजरा केला. यावेळी आमदार मुरजी पटेल, आमदार डॉ. मनिषा कायंदे, उपनेत्या शीतल म्हात्रे, उपनेत्या कला शिंदे, शिल्पा देशमुख, मुंबईतील नगरसेवक, महिला आघाडी, सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसैनिकांनी आज बाळासाहेब भवनाबाहेर शिवसैनिकांनी फटाके फोडून ऑपरेशन सिंदूरवर जल्लोष करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. पहलगाम हल्ल्याचे जशास तसे उत्तर द्यावे, अशी प्रत्येक भारतीयाची इच्छा होती. आज भारतात मॉकड्रील होणार होते मात्र आज प्रत्यक्षात पाकिस्तानवर एअरस्ट्राईक झाला. रात्री दीड वाजता भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त केले. २४ क्षेपणास्त्र डागली. ज्यांनी आमच्या माताभगिनींच्या कपाळाचे कुंकू पुसले होते त्यांचे नामोनिशाण आज भारतीय सैन्याने मिटवले. याबाबत शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकार आणि लष्कराचे अभिनंदन केले, असे शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या. शिवसेना पक्षाकडून राज्यभरात याबाबत जल्लोष केला जाईल, असे त्या म्हणाल्या.
शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे म्हणाल्या की, विरोधकांनी पहलगाम हल्ल्याची खिल्ली उडवली होती. पंतप्रधानांच्या क्षमतेवर शंका उपस्थित करण्यात आले. काँग्रेस नेत्यांनी पहलगाम हल्ल्यातील पिडितांच्या अनुभवावर संशय व्यक्त केला होता. तर उबाठाचे खासदार सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर होते. मात्र आज केंद्र सरकार आणि भारतीय सैन्याने ठोस भूमिका घेत पहलगाम हल्ल्याबाबत दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ऑपरेशन सिंदूर हे नाव अभिमानास्पद आहे. पहलगाम हल्ल्यातील बचावलेल्या भगिनींनी ऑपरेशन सिंदूरवर समाधान व्यक्त केले असे त्या म्हणाल्या.