
मुंबई
राज्यात अद्ययावत व अत्याधुनिक १०८ रुग्णवाहिका आणण्याबाबत मागील काही महिन्यांपासून प्रक्रिया सुरू होती. यावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून, सार्वजनिक आरोग्य विभागाने सुमीत एसएसजी बीव्हीजी महाराष्ट्र ईएमएस प्रायव्हेट लिमिटेडसोबत १० वर्षांचा करार केला. ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’ १०८ रुग्णवाहिका उपक्रमांतर्गत १६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या करारांतर्गत भागीदार संस्था १ हजार ७५६ अत्याधुनिक रुग्णवाहिका तैनात करण्यात येणा आहेत. नवीन १०८ रुग्णवाहिकेचा प्रकल्प पाच टप्प्यात राबविण्यात येणार असून, त्याची अंमलबजावणी नोव्हेंबर २०२५ पासून होणार आहे.
नवीन अत्याधुनिक रुग्णवाहिकेमध्ये मोबाइल डेटा टर्मिनल्स (MDT), टॅबलेट पीसीस, RFID, GPS, कॉलर लोकेशन ट्रॅकिंग, CCTV आणि TRIAGE सीस्टिम्ससारखी अत्याधुनिक तंत्रज्ञानांची यंत्रणा बसविली जाईल. या वाहनांमध्ये ग्राहक संबंध व्यवस्थापन (CRM), कॉम्प्युटर-एडेड डिस्पॅच (CAD), वाहन ट्रॅकिंग आणि व्यवस्थापन (VTMS) व रुग्ण आगमन सूचना या अंतर्निहित सीस्टिम्सही समाविष्ट असतील.
या ताफ्यामध्ये ॲडव्हान्स्ड लाइफ सपोर्ट (ALS) ॲम्बुलन्सेस, बेसिक लाइफ सपोर्ट (BLS) ॲम्बुलन्सेस, निओनॅटल केअर युनिट्स, फर्स्ट रेस्पॉन्डर बाइक्स, तसेच सी आणि रिव्हर बोट ॲम्बुलन्सेस समाविष्ट असतील. दीर्घकालीन दृष्टिकोनातून, MEMS 108 प्रोग्रॅमचा उद्देश मेडिकल ॲप्लिकेशन ड्रोन आणि हेलिकॉप्टर-आधारित आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रदान करण्याचा आहे.
हा उपक्रम भारतातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा क्षेत्रासाठी एक नवीन मानक स्थापित करेल. हा अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित कार्यक्षमतेसह उच्च-गुणवत्तेच्या सेवा पुरविण्यासाठी एक दीर्घकालिक व टिकाऊ मॉडेल निर्माण करेल, तसेच भविष्यातील सार्वजनिक-खासगी भागीदारीसाठी एक आदर्श उभा करेल, असे सुमित ग्रुप एंटरप्राइज उपाध्यक्ष सुमित साळुंके यांनी सांगितले.
मोबाईल ॲपद्वारे बोलावता येणार १०८ रुग्णवाहिका
जवळच्या व्यक्तीची प्रकृती बिघडली, रस्त्यामध्ये अपघात झाला की नागरिकांकडून तातडीने १०८ क्रमांकावर दूरध्वनी करून रुग्णवाहिका बोलविण्यात येते. मात्र बऱ्याचदा ही रुग्णवाहिका कुठपर्यंत पोहचली हे समजत नसल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडत असते. त्यामुळे नोव्हेंबर २०२५ पासून नव्या स्वरुपात येणारी १०८ रुग्णवाहिका मोबाईल ॲपवरही उपलब्ध असणार आहे. या ॲपवरून रुग्णवाहिका बोलविल्यास ती कुठपर्यंत आली याची माहिती सहज उपलब्ध होणार आहे.
रुग्णवाहिकेच्या संख्येत वाढ
राज्यात सध्या ९३७ रुग्णवाहिका असून, त्या १७५६ इतक्या करण्यात येणार आहेत. यामध्ये यामध्ये ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका २५५, बेसिक लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका १२७४, नवजात शिशु रुग्णवाहिका ३६, फर्स्ट रेस्पॉन्डर बाईक्स १६६, समुद्री बोट रुग्णवाहिका १० आणि नदी बोट रुग्णवाहिका १५ यांचा समावेश आहे.