आरोग्य

मुंबईकर झोपेपासून वंचित – वोक्हार्ट हॉस्पिटलचे सर्वेक्षण

मुंबई

३० ते ५५ वयोगटातील काम करणाऱ्या मुंबईकरांवर अलीकडेच करण्यात आलेल्या एका ऑनलाईन सर्वेक्षणातून शहरातील झोपेच्या पद्धती आणि झोपेबाबत असलेल्या गैरसमजांना अधोरेखित करण्यात आले आहे. वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रशांत मखीजा यांनी केलेल्या सर्वेक्षणातून केवळ झोपेच्या कमतरतेची समस्या समोर आली नाही, तर झोपेच्या आरोग्यविषयक जागरूकतेत झालेली वाढ देखील स्पष्ट झाली आहे.

वोक्हार्ट हॉस्पिटलमार्फत करण्यात आलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणामध्ये शहरी भागांतील नागरिकांना काम आणि प्रवासामुळे झोपेचा त्रास होत असल्याचे दिसून आले. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या व्यक्तींपैकी ६३.५७ टक्के व्यक्तींनी दररोज ६ तासांपेक्षा कमी झोप घेत असल्याचे सांगतात. मुंबईसारख्या महानगरांमध्ये झोपेच्या कमतरतेचा प्रसार वाढत आहे. लोक सहा तासांची झोप अपुरी समजतात, तरीही दैनंदिन गरजा त्यांना पुरेशी झोप घेण्यास अडथळा ठरतात.

पुरेशी झोप घेण्यामध्ये कामकाजाप्रमाणे अनेक अडथळे असल्याचे दिसून आले. यामध्ये ध्वनी प्रदूषणामुळे ६४.२३ टक्के लोकांनी हॉर्न, बांधकाम आणि शेजाऱ्यांचा गोंगाटामुळे झोपेवर परिणाम होत असल्याचे सांगितले. तसेच दररोज होत असलेल्या अपुऱ्या झोपेची कसर ही आठवड्याच्या शेवटी भरून काढत असल्याचे ५९.६२ टक्के लोकांनी सांगितले. मात्र ही झोप म्हणजे एक प्रकारची स्वत:ची फसवणूक असते. वीकेंडला जास्त झोप घेतल्याने क्षणिक दिलासा मिळतो, पण सतत झोपेच्या कमतरतेचे दुष्परिणाम टळत नसल्याचे डॉ. मखीजा यांनी सांगितले.

झोपेपूर्वी अनेकांना सोशल मीडियावर वेळ घालवायला आवडत असले तरी हे प्रमाण २४.६० टक्के इतके आहे. ७५.४० टक्के लोक हे झोपेपूर्वी शांततादायक सवयी अंगीकारतात, तर ५५.७४ टक्के लोकांनी रात्री उशिरा जेवण किंवा सामाजिक कार्यक्रमांसाठी झोपेकडे दुर्लक्ष करत नसल्याचे सांगितले. यावरून विचलित करणाऱ्या गोष्टी असूनही मुंबईकर झोपेसाठी सकारात्मक सवयी जपण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

झोपेचा आरोग्याशी संबंधाबाबत नागरिक अनभिज्ञ
घोरणे हे अनेकदा ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (OSA) चे लक्षण असते. याकडे दुर्लक्ष केल्यास हृदयविकार, स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. मात्र ५३.२३ टक्के लोक घोरणे सामान्य मानतात. झोपेची कमतरता आणि मानसिक-शारीरिक आरोग्य यांचा थेट संबंध असल्याचे केवळ ५२.६६ टक्के लोक मान्य करतात. तर जवळपास ४७ टक्के लोकांना याबाबत माहितीच नसल्याचे सर्वेक्षणात दिसून आले. त्याचप्रमाणे मुंबईतील ४४.८९ टक्के लोक दिवसभर सतर्क राहण्यासाठी चहा-कॉफीवर अवलंबून आहेत. उर्वरित लोक कोणत्याही उत्तेजकांशिवाय काम करतात.

झोपेचे महत्त्व जाणणारे, पण झोपू न शकणारे शहर

या सर्वेक्षणातून हे स्पष्ट होते की, मुंबईतील लोक झोपेचे महत्त्व ओळखतात, पण सामाजिक, पर्यावरणीय आणि व्यावसायिक अडचणीमुळे झोप घेणे कठीण बनले आहे. शहरी आवाज सर्केडियन लय आणि आरईएम झोपेमध्ये अडथळा निर्माण करतात, ज्यामुळे चिंता, उच्च रक्तदाब आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यासारखे गंभीर परिणाम होऊ शकतात.

तीनपैकी दोन मुंबईकर झोपेपासून वंचित असल्याने सार्वजनिक आरोग्य उपाययोजना, ध्वनी प्रदूषण नियंत्रण आणि झोपेसंदर्भातील शैक्षणिक मोहिमा राबवण्याची नितांत गरज आहे. झोप ही केवळ विश्रांती नसून मेंदूचे आरोग्य, हार्मोनल संतुलन आणि भावनिक नियंत्रणासाठी अत्यावश्यक आहे. झोप केवळ पर्याय नसून, झोपेला आरोग्याचा एक मूलभूत आधारस्तंभ मानले पाहिजे, असे मत वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलचे सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्रशांत मखीजा यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *