
मुंबई :
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यामध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणात आहे. अकरावी प्रवेशादरम्यान विद्यार्थ्यांचा अर्ज भरताना असणारा गोंधळ लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेदरम्यान प्रत्येक फेरीनंतर शाखा बदलण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पसंतीनुसार कला, वाणिज्य व विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेता येणार आहे.
मुंबई, पुणे-पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, अमरावती आणि छत्रपती संभाजी नगर या सहा महानगरपालिका क्षेत्रामधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत होती. मात्र यंदापासून संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यादृष्टीकोनातून आवश्यक सूचना शालेय शिक्षण विभागाने जारी करताना अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी १९ मे पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थांना ऑनलाईन नोंदणी करून त्यांची वैयक्तिक माहिती भरता येणार आहे. दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरताना प्रती विद्यार्थी १०० रुपये प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांपैकी एका शाखेची निवड करावी लागणार आहे. ही निवड करताना अनेक विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असते. काहीवेळेस घरातील किंवा मित्रांच्या सल्ल्यानुसार शाखा निवड केली जाते. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थ्यांना शाखा बदल करून त्यांना योग्य शाखेत प्रवेश घेता यावा, यासाठी शिक्षण विभागाकडून प्रवेश प्रक्रियेदरम्यान प्रत्येक फेरीनंतर शाखा बदलण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येक फेरीमध्ये एकाच शाखेची निवड करावी लागणार आहे.
फेरीदरम्यान एखाद्या शाखेतून जागा मिळाल्यास मात्र विद्यार्थ्यांना अन्य शाखेत प्रवेश घ्यायचा असल्यास त्याने पहिल्या शाखेतील जागेवर प्रवेश घेऊ नये. त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये त्याला शाखा बदलण्याचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. मात्र प्रथम प्राधान्याचे महाविद्यालय मिळाल्यास विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास त्यांना थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे.
बनावट कागदपत्रे सादर केल्यास होणार कारवाई
इयत्ता ११ वी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान निवड झालेल्या विद्यार्थ्याने प्रवेश निश्चित करण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचे उघडकीस आल्यास त्यावर आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे इयत्ता १० वीच्या गुणपत्रिकेमध्ये फेरफार केल्यास इयत्ता ११ वीच्या प्रवेश प्रकियेतून २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रतिबंधित करण्यात येईल, अशा स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.